‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’

0
63
  • डॉ. मनाली म. पवार (सांतइनेज, पणजी)

सामान्यतः सर्वसामान्याला माहीत असलेला आयुर्वेद म्हणजे ‘गावठी औषधे’, झाडपाल्याचे औषध, जडीबुटी, कडू काढे व चूर्ण… दुष्परिणाम नसणारे शास्त्र किंवा इमर्जन्सीमध्ये उपयोगी न पडणारे शास्त्र असाच या आयुर्वेद शास्त्राबद्दल गैरसमज आहे. पण आयुर्वेद हे असे ‘जीवनशास्त्र’ आहे जे निरोगी स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांगीण उपयोगी पडणारे शास्त्र आहे.

आयुर्वेद आता फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही. इतर अमेरिका, युरोपसारख्या देशातही लोकप्रिय झालेला आहे. आयुर्वेद सध्या ‘मोस्ट वॉंटेड मेडिकल सायन्स/लाईफ सायन्स’ बनलेले आहे. आज कोरोना महामारीच्या काळात तर आयुर्वेद शास्त्राचे जनसमुदायाच्या आरोग्याबाबत मोलाचे योगदान सिद्ध झाले आहे. मॉडर्न मेडिसीन हे इमर्जन्सीमध्ये/ इन्फेक्टिव्ह डिसिजेसमध्ये निश्‍चितच उपयोगी आहे. परंतु याही शास्त्राला काही ठिकाणी मर्यादा पडतात. आता कोरोना महामारीच्या काळात कोणतेच शास्त्र कोरोना व्हायरसवर मात करू शकले नाही पण आयुर्वेद शास्त्राचा सल्ला (प्रकृती- दिनचर्या- ऋतुचर्या- आहार- विहार- योग) हा अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आयुर्वेदास कोरोना महामारीच्या काळातही प्राधान्य दिले आहे.

सामान्यतः सर्वसामान्याला माहीत असलेला आयुर्वेद म्हणजे ‘गावठी औषधे’, झाडपाल्याचे औषध, जडीबुटी, कडू काढे व चूर्ण… दुष्परिणाम नसणारे शास्त्र किंवा इमर्जन्सीमध्ये उपयोगी न पडणारे शास्त्र असाच या आयुर्वेद शास्त्राबद्दल गैरसमज आहे. पण आयुर्वेद हे असे ‘जीवनशास्त्र’ आहे जे निरोगी स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांगीण उपयोगी पडणारे शास्त्र आहे.

आयुर्वेदशास्त्राचा प्रचार व प्रसार होण्यासाठी गेल्या १५ ते २० वर्षांपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. ‘डॉक्टर्स डे’ जसा प्रचलीत आहे तसेच भारतीय उपचार पद्धती असलेले आयुर्वेद शास्त्र संपूर्ण जगाला समजावे या हेतूने आयुर्वेद शास्त्राचा दिनविशेष असावा अशी मागणी सुरू केली व या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर केंद्रिय आयुष मंत्रालयाने कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. तेव्हा बहुसंख्य आयुर्वेद प्रेमींनी दिवाळीतील ‘धनत्रयोदशी’ या दिवसाचा आग्रह धरला व धनत्रयोदशीला म्हणजे २८ ऑक्टोबरला २०१६ मध्ये पहिला ‘आयुर्वेद दिवस’ साजरा करण्यात आला.

धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत कलश घेऊन धन्वंतरी देवता आली, असे वर्णन किंवा अशी आख्यायिका पुराण ग्रंथात सापडते. तसेच धन्वंतरीच्या एका हातात घट (अमृत, औषधीयुक्त कलश), जलौका (जळू), शंख अशी आयुधे आहेत जी आरोग्याची सूचक आहेत. म्हणूनच धन्वंतरी जयंती दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी तो २ नोव्हेंबरला साजरा करण्यात येईल.
अथर्ववेदात आयुर्वेदाचे अनेक उल्लेख असल्याने आयुर्वेद हा अथर्ववेदाचाच उपवेद आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु ऋग्वेदातही आयुर्वेदाची मुलभूत तत्त्वे आणि इतर गोष्टींचा विस्ताराने खुलासा आहे.

आयुर्वेद शास्त्रामध्ये फक्त हाड, मांस, रक्त, सापळा म्हणजेच शरीर नव्हे तर मन, आत्मा, अग्नी, ओज, दोष, धातू, मल इत्यादी म्हणजे शरीर मानले आहे. जरा अजून मागे वेदकाळाचा विचार केल्यास इंद्र देवतेला वात- प्राण अशी नावे दिली आहेत. शरीरातील तीन प्रमुख शक्तींपैकी ही एक शक्ती आहे जी शरीरातील सर्व कार्ये घडवून आणते. अग्नी-पित्त आणि सोम- कफ यांचा संबंध आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथांमधूनही स्पष्ट केला आहे.
इंद्र- अग्नी- सोम या देवतांचा संबंध शरीरातील तीन सूक्ष्म शक्तींशी प्राण- तेजस्- ओजस् जोडला जातो. या तीनही शक्तींचे साम्य राखण्यासाठी मंत्रं, वनस्पती, ध्यान- धारणा, योग यांचा उपयोग केला जातो. वेदातील यज्ञ आणि त्यामधून उत्पन्न झालेली राख यांचाही उपयोग चिकित्सेसाठी केला आहे.

इंद्राच्या नावाने अनेक प्रार्थना ऋग्वेदात आहेत. या मंत्राचा उपयोग प्राणशक्ती किंवा वातदोष शुद्ध करण्यासाठी करावा. त्याचप्रमाणे अग्नी देवतेचे मंत्र आणि वैदिक योगप्रक्रियेत शरीरातील अग्नी सुस्थितीत ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. आपण जे अन्न खातो त्याची आहूती (सोम) या अग्नीला द्याल तरच तो संतुष्ट होतो असे वर्णन आढळते. तसेच अनेक औषधांचे योगही वर्णन केलेले आहे. म्हणजे आयुर्वेद शास्त्र हे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारे शास्त्र आहे. गरज आहे ती अभ्यासकांची. ते शास्त्र योग्यरीत्या जाणून घेण्याची.
आयुर्वेद म्हणजे काय?
आयुष वेदः आयुर्वेदः| – आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. जीवनाचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद. हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ते जीवनशास्त्र आहे. जीवन विद्या आहे. जन्मापासून मृत्युपर्यंतचा काळ म्हणजेच आयु. शरीर, इंद्रियं, सत्व, आत्मा यांच्या संयोगाला आयु म्हणतात. इंद्रिय, मन, आत्मा यांचा संयोग टिकवून ठेवणारा म्हणजे धारण करणारा म्हणजे आयु.
आयु = शरीर + इंद्रिय + सत्व + आत्मा
यांचे ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र होय.
फक्त शरीराला झालेला रोग बरा करणे, त्याच्यावर औषधोपचार करणे म्हणजे आयुर्वेदशास्त्र नव्हे! आयुर्वेदशास्त्र हे व्यापक आहे. या शास्त्राचा मूळ सिद्धांतच वेगळा आहे आणि तो जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आजच्या स्वर्धात्मक युगात जीवनशैली आजार म्हणा किंवा ताणजन्य आजारांचा जो प्रसार झालेला आहे, त्यावर फक्त आयुर्वेद शास्त्रच मात करू शकते. त्यासाठी फक्त औषधोपचार पुरेसे नाही. आयुर्वेदशास्त्राचे आचरण करणेही गरजेचे आहे. आयुर्वेदाची उत्पत्ती मानवाची आरोग्यसंपन्नता टिकविण्याच्या उद्देशाने झालेली आहे.
स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आयुरस्य व्याधिपरिमोक्ष |
रोगी व्यक्तीचा रोगनाश या उद्देशापेक्षाही स्वस्थ मनुष्याचे स्वास्थ्यरक्षण या उद्देशाला आयुर्वेदाने आग्रक्रम दिला आहे. कारण स्वास्थ्य असणे ही अगदी नैसर्गिक, प्राकृतिक गोष्ट आहे. त्याच्या रक्षणासाठी आवश्यक असणार्‍या शास्त्राचे आचरण न केले तरच व्याधी होतात व व्याधीचा परिमोक्ष करणे म्हणजेही पर्यायाने पुन्हा स्वास्थ्य प्रस्थापित करणेच असते. रोग झाल्यानंतर त्याची चिकित्सा करण्यापेक्षा रोग होऊ न देणे यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. चूक करून ती दुरुस्त करण्यापेक्षा चूकच न करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

चुकांमुळेच रोगाची उत्पत्ती होते. या चुका म्हणजे असात्म्य इंद्रियार्थ संयोग व प्रज्ञापराध हे अनुक्रमे शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या उपदेशाचे उल्लंघन केल्यामुळे घडून येणार्‍या चुका आहेत. काल हा हेतू (कारण) हा अपरिहार्य असला तरीही पूर्वीचे दोन हेतू त्याला साहाय्यक झाल्यावाचून व्याधीची उत्पत्ती होत नाही. म्हणजेच चुका न केल्यास व्याधी/आजार होण्याची शक्यता राहणार नाही व या चुका कोणत्या व स्वास्थ्यरक्षणाचे योग्य मार्ग कोणते हे समजण्यासाठी आयुर्वेद शास्त्र जाणणे आवश्यक आहे.
आजार उत्पन्न झाल्यावर त्यावर उपायांचे ज्ञान समाजातील प्रत्येक व्यक्तीला करून देणे शक्य नाही. परंतु व्याधी उत्पन्न होऊ न देण्यासाठी आचरण्याच्या शास्त्राचे ज्ञान ग्रहण करणे व त्याप्रमाणे आचरण करणे ही गोष्ट व्यक्ती व समाजाच्या आटोक्यामधील असते. शास्त्रीय सखोलता कळली नसली तरी वैद्याच्या आप्तवचनांवर विश्‍वास ठेवून समाजाने नियम पाळले तरी व्यक्ती व समाजाचे स्वास्थ्यरक्षण होऊ शकते. समाजापर्यंत हे शास्त्र पोहोचवण्यासाठी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’!
मनाच्या रज, तम या दोषांमुळे समाज हा स्वास्थ्याचे नियम कळले तरी त्याप्रमाणे वागतोच असे नाही. किंबहुना न वागण्याची शक्यता अधिक आणि वैद्य केवळ उपदेश करू शकतो. म्हणून राष्ट्रयंत्रणेला आरोग्याचे महत्त्व देऊन व त्यांच्याशी सहकार्य करून वैद्य ही व्यक्ती व समाजाच्या स्वास्थ्यरक्षणाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकतो व म्हणून हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’!
जनपदोध्वंस व्याधींमध्ये त्या त्या ठिकाणच्या देश, जल, तेज, वायु, काल इत्यादी समाजाशी संबंध असणार्‍या व्यापक गोष्टींचीच दुष्टी झालेली असते. आजची कोरोना महामारी घ्या ना! अशा प्रसंगी व्यक्तिच्या व शासनाच्या मदतीने समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे वैद्याचे कर्तव्य या विशिष्ट परिस्थितीत आचरावयाचे नियम, दक्षता, शक्यतो उपाययोजना यांचा विचार आयुर्वेदशास्त्रात असल्याने हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’!
व्यक्ती- व्यक्तीच्या आरोग्यानेच समाजाचे आरोग्य टिकणार हे खरे असले तरी अनेक व्यक्ती एकत्र येऊन वसाहती, गावे, शहरे, राज्य असे गट बनतात. तेव्हा स्वास्थ्यरक्षणासाठी आवश्यक बाबींचा केवळ व्यक्तीचा विचार न करता सामूहिक किंवा सामाजिक स्तरावर व स्वतंत्रपणे विचार करावा लागतो म्हणून हा दिवस.
थोडक्यात सुखी आरोग्यपूर्ण जीवनासाठी शरीर- मानस स्वास्थ्य आवश्यक असून रोग होऊन बरे करण्यापेक्षा ‘स्वास्थ्याचरणाने’ ते होऊ न देणे अधिक महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदशास्त्रामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःची स्वतःला ओळखता येण्यासारखी स्वास्थ्यलक्षणे दिली आहेत.. ती लक्षणे अशी….

  • योग्य वेळी उत्तम चरचरीत भूक लागून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे.
  • मल, मूत्र, अपान यांचे योग्य निःसारण विनात्रास होणे.
  • योग्य वेळी शांत, गाढ झोप लागून झोप पूर्ण होऊन योग्य वेळी जाग येणे व त्यानंतर टवटवीत वाटणे.
  • या सर्व क्रिया प्राकृत स्थितीत घडत राहिल्याने शरीरघटकांचे योग्य पोषण होऊन शरीरबल वाढणे, वर्णकांती, ओज यांची वाढ होणे, शरीरात आळस, सुस्ती न राहता उत्साह व हलकेपणा वाटणे आणि त्याचबरोबर..
  • मनामध्ये रज- तम दोषांमुळे उद्भवणारे दुर्विकार न येता मन प्रसन्न असणे ही आरोग्याची लक्षणे…
    हे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी नुसत्या औषधांची नव्हे तर आयुर्वेदशास्त्राचे आचरण करण्याची गरज आहे. ही स्वास्थ्यलक्षणे प्राप्त होण्यासाठी किंवा असलेली टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये आचारायचे काही नियम ‘दिनचर्या’ या स्वरूपात वर्णिलेले आहेत व ऋतुमानानुसार त्यात करण्याचे बदल ‘ऋतुचर्या’ म्हणून वर्णन केलेले आहेत.

आजच्या गतिमान व अर्थप्रधान संस्कृतीच्या कालखंडात अभ्यंग, नस्य, धूमपान, गंण्डूष, स्नान, ब्रह्मकर्म, अंजन इत्यादीसाठी एवढा वेळ खर्च करणे, त्यांचे तंतोतंत पालन करणे शक्य होईलच असे नाही. परंतु साप्ताहिक सुट्टी, रिकामा वेळ, अन्य सुट्‌ट्या किमान आठ दिवसातून एकदा तरी आपण अभ्यंगादी कर्मांचे नक्की आचरण करू शकता व दिनचर्येचे पालन करू शकता.

शरीरातील देवादिकांची अंतःस्थिती व सतत बदलती बाह्यस्थिती यातील विरोध टाळून सुसंवाद निर्माण करून कायम ठेवणे हेच ऋतुचर्येचे उद्दिष्ट आहे. शरीराला रोगप्रतिकारासाठी जी आवश्यकता भासेल ते मिळावे व शरीरस्वास्थ्य टिकविण्यासाठी शरीरास नको असलेले भारपदार्थ वाढले असतील तर ते कमी करणे ह्यासाठी ऋतुचर्येचे पालन करावे.

आयुर्वेदशास्त्रात रोग उत्पन्न होऊ नये म्हणून ‘आहाराला’, पथ्यापथ्याला खूप महत्त्व आहे. भोजन गरम गरम व स्निग्ध असतानाच सेवन करावे. जेवण फार गडबडीत किंवा अति सावकाश करू नये. जेवताना फार गप्पा मारू नयेत. अतिप्रमाणात हसू नये. योग्य मात्रेतच जेवण करावे. भोजनावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जेवण जेवावे. तसेच माध्यान्हकाळी सुमारे १०.३० ते १२च्या दरम्यान व रात्री सुमारे ७ ते ९ च्या दरम्यान दोन वेळाच भोजन करावे. कडकडून भूक लागल्यावर भोजन घेतल्यास त्याचे योग्य पचन होऊन शरीराचे बृहण होते.

अध्यशन, विषमाशन, समाशन, विरुद्धाशन अशा पाच प्रकारचा आहार सेवन करू नये. कारण त्यापासूनच आजार उत्पन्न होतात. म्हणूनच आयुर्वेद असे एकमेव शास्त्र आहे ज्यात आहाराचा विशेष विचार केला आहे.

मनुष्याला सुखदुःखाच्या बंधनात अडकवण्यास मन हेच कारणीभूत असते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात- ‘मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धिसी कारण॥ मनाचा समतोल साधावयाचा असेल तर योगशास्त्राच्या संबंधामुळे आजकाल पाश्‍चात्त्य देशातील लोकांचे लक्ष आयुर्वेदाकडे आकृष्ट झाले आहे.
आयुर्वेद शास्त्राचे आचरण का करावे?…

  • प्रज्ञापराध व आसात्म्य इंद्रियार्थ संयोग हे दोन प्रधान हेतू स्वस्थाचरणाने टाळता येतात.,
  • दिनचर्या व ऋतुचर्या यांच्या आचरणाने परिणाम किंवा काळाचे दुष्परिणाम टाळता येतात.
  • सद्यस्थितीत व्यवसायजन्य रोग, जीवनशैलीजन्य रोग, मानसिक ताण-तणावजन्य रोग इ. योगसाधनेच्या आचरणाने टाळता येतात.

वैयक्तिक व सामाजिक स्वास्थ्याचे नियम व उपाय यांचे ज्ञान व्यक्तींना, समाजाला व समाजनियंत्रक शासनाला करून देणे हे शक्य आहे व आवश्.यक आहे. यासाठी राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने हे प्रबोधन कोरोना महामारीसारख्या जनपदोद्ध्वंसापासून समाजाचा बचाव करण्यासाठी संपूर्ण राष्ट्राला आयुर्वेदशास्त्र समजणे- जाणणे हाच मार्ग आहे.