घराणेशाहीला कौल

0
384

कॉंग्रेस कार्यसमितीच्या कालच्या ऑनलाइन बैठकीमध्ये पक्षाला नवी दिशा देणे दूरच राहिले, परंतु गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेचे सवंग प्रदर्शन करण्यालाच प्राधान्य राहिल्याचे स्पष्ट दिसले. बैठकीची सुरुवात करतानाच सोनिया गांधींनी आपल्या जागी आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा असे सांगणे आणि पक्षाध्यक्षपदासाठी ज्यांची नावे चर्चेत होती, त्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, ए. के. अँटनी यांनी लागलीच ‘तुम्हीच अध्यक्ष राहा’ म्हणून सोनियांची मनधरणी करणे, लागोपाठ सर्वांची आपल्या गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेचे प्रदर्शन करण्याची अहमहमिका लागणे हा सारा प्रकार खुंटा हलवून बळकट करणे म्हणतात तसाच झाला. भले, सोनिया यांच्याकडे तूर्त अंतरिम अध्यक्षपद राहणार असले तरी त्यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांच्याच नावाचा आग्रह कॉंग्रेस महाअधिवेशनात धरला जाईल हेही यातून स्पष्ट झाले आहे. गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारली जाणार नाही अशी घोषणाबाजी करीत कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर झालेली निदर्शनेही बोलकी आहेत. ही सगळी वातावरणनिर्मिती अर्थात, राहुल यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठीच केली गेलेली दिसते. पक्षाला सामूहिक नेतृत्वाची अपेक्षा करणारा बंडखोरांचा आवाज अखेर दुबळाच ठरला आहे.
ज्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले, ते आधीच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेभोवतीच संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्यात काल राहुल गांधी यांनी केलेले अप्रत्यक्ष शरसंधान त्यांना जिव्हारी लागणारे ठरले. या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होताच कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आदींनी आपल्या पक्षनिष्ठेचे जाहीर प्रदर्शन घडवित आपल्यावरील घरभेदीपणाचा आरोप धुडकावून लावण्याचा निकराने प्रयत्न जरी केला, तरीही बैठकीदरम्यान बैठकीत आणि बाहेर जे घडले त्यातून कॉंग्रेस पक्षामधील उभी भेग दृगोच्चर झालीच आहे. हरियाणा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा शैलजा आदींनी पत्रलेखक नेत्यांवर केलेला भाजपचे हस्तक असल्याचा जाहीर आरोप, अंबिका सोनी यांनी केलेली त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी आदींमधून या नेत्यांवर जवळजवळ बंडखोरीचा शिक्का मारला गेला आहे. पक्षामध्ये या नेत्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी सोनिया व राहुल यांच्या उदोउदोपुढे ते फिके ठरणार आहे हेच या घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे.
एकीकडे पक्षामध्ये पूर्णकालीक प्रभावी नेतृत्वाची मागणी हे ज्येष्ठ नेते करीत असताना दुसरीकडे गांधी घराण्याशी एकनिष्ठतेची ग्वाही देत ठिकठिकाणच्या कॉंग्रेस नेत्यांनी सोनियांना दिलेले समर्थन पाहिले तर कॉंग्रेस पक्षामध्ये गांधी घराणेशाहीला अजूनही पर्याय नाही हेच सिद्ध होते. मनमोहनसिंग, अँटनी आदी ‘पर्यायां’च्या तोंडूनच व्यक्त झालेली सोनियानिष्ठा फार बोलकी आहे. म्हणजेच या पत्रातून डोंगर पोखरूनही शेवटी फार फार तर भविष्यात राहुल गांधींचा उंदीरच निघणार आहे. ज्या ‘सामूहिक नेतृत्वा’ची अपेक्षा पत्रात करण्यात आली आहे, त्याची उपलब्धी केवळ निवडणुकांतील पराभवाची जबाबदारी पक्षनेतृत्वावर थेट येऊ नये यासाठीच ग्राह्य धरली जाऊ शकते.
अखिल भारतीय कॉंग्रेस महाअधिवेशनापर्यंत नेतृत्वाचा विषय लांबणीवर पडणे याचाच अर्थ त्या अधिवेशनात मागच्या वेळेसारखेच सोनियानिष्ठेचे प्रदर्शन होणे, राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व देण्याची मागणी होणे या सार्‍या प्रकारांची पुनरावृत्ती होणार असल्याने आता पक्षाची सारी मदार राहुल यांच्या भूमिकेवर राहील. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर खट्टू होऊन पक्षापासून पलायन केलेल्या राहुल यांनी परत आल्याखेरीज नेतृत्वाबाबत सर्वसहमती होणे अशक्य आहे हेच या २३ नेत्यांच्या पत्राच्या अनुषंगाने घडलेल्या कालच्या घटनाक्रमातून दिसून आले आहे. सामूहिक नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करताना सदर पत्रामध्ये भले ‘या सामूहिक नेतृत्वाचा गांधी परिवार भाग असेल’ असे नमूद केले गेलेले असले, तरी काल ज्या प्रकारे या नेत्यांवर पक्षांतर्गत टीकेची झोड उठली, ती पाहिली, तर त्यांच्या पक्षनिष्ठेवरच शंका घेतली गेलेली दिसते. याचे पडसाद यापुढील काळातही नक्की उमटत राहतील. गांधी घराण्याबाहेरील नेतृत्व स्वीकारण्याची पक्षाची अजूनही मानसिकता नाही आणि तसा प्रयत्न झाला तर पक्षात फूट अटळ आहे हाच संदेश कालच्या घडामोडीतून बाहेर दिला गेला आहे.