सोनिया गांधीच कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष

0
336

>> कार्यसमितीची सात तास वादळी बैठक; सोनियांस सर्वाधिकार
>> भाजपशी हातमिळवणीचा आरोप सिब्बल, आझाद यांनी फेटाळला

पक्षामध्ये पूर्णकालीक व प्रभावी नेतृत्वाची गरज व्यक्त करणार्‍या २३ पक्षनेत्यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय कॉंग्रेस कार्यसमितीची वादळी बैठक ऑनलाइन पार पडली. जवळजवळ सात तास चाललेल्या या बैठकीनंतर तूर्त कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी राहावे असा निर्णय घेण्यात आला.

आपल्या जागी पर्याय निवडण्याची पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेली सूचना, पत्राद्वारे आपले म्हणणे मांडणार्‍या ज्येष्ठ नेत्यांप्रती राहुल गांधी यांनी केेलेली कथित शेरेबाजी, त्यावर कपिल सिबल यांनी जाहीरपणे दिलेले प्रत्युत्तर, गुलाम नबी आझाद यांनी आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची दर्शवलेली तयारी व शेवटी राहुल यांनी आपण तसे म्हटलेच नव्हते असे स्पष्टीकरण केल्यानंतर सिब्बल व आझाद यांनी केलेले घूमजाव अशा अनेक नाट्यमय घडामोडी कालच्या बैठकीदरम्यान घडल्या.

कॉंग्रेस कार्यसमितीची कालची बैठक अपेक्षेनुसार वादळी ठरली. बैठकीच्या प्रारंभीच कॉंग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आपल्या जागी पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी अशी सूचना कार्यसमिती सदस्यांना केली. त्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तसेच ए. के. अँटनी यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी मागणी केली. कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन होईपर्यंत तरी सोनियांनी कार्यभार सांभाळावा अशी विनंतीही पी. चिदंबरम आदी सदस्यांनी यावेळी केली.

सोनियांना पक्ष पुनर्रचनेचे अधिकार
‘कोणाला पक्ष कमकुवत करू देणार नाही’

कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यसमितीने सर्वसहमतीने श्रीमती सोनिया गांधी यांना पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन भरेपर्यंत पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली असून त्यांना पक्षाच्या पुनर्रचनेचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती कॉंग्रेस प्रवक्ते के. सी. वेणुगोपाल यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष प्रवक्ते रणदीप सूरजेवाला हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

पक्षातील अंतर्गत विषय प्रसारमाध्यमांपुढे चर्चिले जाऊ नयेत असेही पक्षाच्या कार्यसमिती बैठकीत ठरवण्यात आले असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपले म्हणणे केवळ पक्षाच्या व्यासपीठावरच मांडावे, पक्षाची मूलभूत शिस्त आणि तत्त्वांचे पालन करण्यास सर्व सदस्य बांधील आहेत, असे ते पुढे म्हणाले. कोणालाही पक्षाला अथवा पक्षनेतेपदाला विद्यमान परिस्थितीत कमकुवत करू दिले जाणार नाही असा निर्धारही पक्षाच्या कार्यसमिती बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या घडीस भारतीय लोकशाही, विविधता यावरील मोदी सरकारने चालवलेला हल्ला रोखणे ही प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याची जबाबदारी आहे असे ते पुढे म्हणाले.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार कॉंग्रेस कार्यसमिती बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.

कोणाबद्दल कटुता नाही ः सोनिया
कॉंग्रेस पक्ष हे एक मोठे कुटुंब आहे. आमच्यात मतभेद असू शकतात आणि अनेक मुद्द्यांवर वेगळी मतेही असू शकतात, परंतु शेवटी आम्ही सगळे एक होऊन एकत्र येत असतो. आज देशासमोरील प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ आहे. संघटनात्मक प्रश्न, संस्थात्मक रचना वा पुनर्रचना ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. कोणत्याही पक्षसदस्याप्रती आपल्या मनात कटुता नाही. पक्ष एकसंध ठेवूया’’ अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी काल दिली.

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी २३ सदस्यांनी लिहिलेल्या व प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचलेल्या पत्रावरून आपली नापसंती व्यक्त करताना या पत्राची वेळ चुकीची असल्याचे प्रतिपादन केले. ‘हे सगळे कोणासाठी केले गेले आहे’ असा सवालही राहुल यांनी केला. हा पक्षांतर्गत विषय असताना हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्याबद्दलही त्यांनी नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, पक्षनेतृत्वापाशी विविध मागण्यांचे सामूहिक पत्र लिहिणार्‍या नेत्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी आदींनी केली आहे.
सोनी यांनी केलेल्या या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमच्यावर कारवाई जरूर करा, परंतु तरीही आम्ही कॉंग्रेसशी एकनिष्ठच राहू अशी प्रतिक्रिया गुलाम नबी आझाद यांनी दिली.

सिब्बल यांचे प्रत्युत्तर व माघार
काही कॉंग्रेस नेत्यांनी भाजपच्या सांगण्यावरूनच हे पत्र लिहिले गेले असल्याची टीका केल्याने सदर टीका राहुल गांधी यांनी केल्याचा समज झाल्याने माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्वीट करून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. राजस्थानच्या राजकीय घडामोडींसंदर्भातील न्यायालयीन लढाईत आपण कॉंग्रेसची बाजू लढवली होती, मणिपूरच्या सत्तापालटामध्ये कॉंग्रेसला आपण मदत केली होती, आजवरच्या आपल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भाजपच्या समर्थनार्थ एकही विधान आपण केलेले नाही, तरी देखील भाजपशी आपण हातमिळवणी केल्याचा आरोप झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः सिब्बल यांच्याशी संपर्क साधून सदर विधान आपले नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर सिब्बल यांनी आपले ट्वीट काढून टाकले. कॉंग्रेस प्रवक्त्यांनीही स्पष्टीकरण देताना राहुल गांधी यांनी तशा प्रकारचे विधान बैठकीत केले नसल्याचे सांगितले.

गुलाम नबी आझाद यांची पक्षत्यागाची तयारी
कॉंग्रेसचे राज्यसभेचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आपण भाजपचे हस्तक असल्याचे सिद्ध झाल्यास पक्षत्याग करण्याची आपली तयारी असल्याचे प्रतिपादन काल केले. मात्र, त्यानंतर आपले सदर आव्हान हे कॉंग्रेसच्या अन्य काही नेत्यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात होते, ते राहुल गांधी यांच्या संदर्भात नव्हते असा खुलासा नंतर आझाद यांनी केला. सिब्बल व आझाद या दोघांच्याही २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर सह्या आहेत.