घरगुती सिलिंडर २५ रुपयांनी महागला

0
48

>> गोव्यात ८७३.५० रुपये किंमत, सर्वसामान्यांना मोठा फटका

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ केली असल्यामुळे आता विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महागला आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू झाली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये आणि लखनऊमध्ये ८९७.५ रुपये तर गोव्यात ८७३.५० झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्यांची किंमत वाढून १६१८ रुपये झाली आहे.

२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे.

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. यापूर्वी १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारवर बरीच टीका होत आहे. पण हे सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर अवलंबून आहे आणि सरकारच्या हातात काही नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले होते. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. तसेच इंधनदरवाढीला सर्वस्वी कॉंग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. कॉंग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधन दरात घट होणे कठीण असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले होते. व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावे लागणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट महिन्यात पुन्हा वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७३.५० रुपयांची वाढ केली होती. तर घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा दर जुलैप्रमाणे कायम ठेवला होता. त्यामुळे दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना कंपन्यांनी दणका दिला होता. तर सामान्य ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला होता.

गोव्यात ८७३.५० रुपये

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली असून ही वाढ थोडी थोडकी नसून सिलिंडरमागे २५ रुपये एवढी आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे सामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
आतापर्यंत राज्यात एलपीजी सिलिंडर ८४८ रुपयांना मिळत असे. मात्र आता सिलिंडरमागे २५ रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता ह्या सिलिंडरची किंमत ८७३.५० रुपये एवढी झाली आहे.

दरम्यान, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ६८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत नवी दिल्लीत १६१८ रुपये एवढी झाली आहे.