गोमेकॉसमोरील गाड्यांचे पुनर्वसन करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

0
42

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या जवळ कुंपणाबाहेर असलेले जे गाडे उत्तर गोवा जिल्हाधिकर्‍यांच्या आदेशानुसार हटविण्यात आले होते, त्यापैकी सरकारी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पाच गाड्यांचे येत्या चार आठवड्यांच्या आत ठरलेल्या ठिकाणी पुनर्वसन केले जावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल राज्यसरकारला दिला.

न्यायमूर्ती एस. जे. काठवाला व न्यायमूर्ती मिलिंद एन. माधव ह्या द्विसदस्यीय विशेष खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
ह्या प्रकरणी शिवराम नाईक, दीप्ती नाईक, बाबलो हळदणकर, लक्ष्मी लमाणी व प्रज्योती आमणकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. ह्या प्रकरणी राज्य सरकार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इतरांना प्रतिवादी केले आहेत. याचिकादारांना सरकारी योजनेंत गाडे देण्यात आले होते. हे गाडे पाडण्यात आल्यानंतर त्यांनी आपले पुनर्वसन केले जावे यासाठी खंडपीठासमोर याचिका सादर केली होती.
राज्य सरकारने ह्या गाड्यांचे पुनर्वसन करण्याची हमी खंडपीठाला दिली आहे.