राज्यातील नव्या वीज अधिभारासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करताना राज्यातील बहुतेक वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांनी चुकीचे वृत्त दिल्याचा दावा काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. घरगुती वापरासाठीच्या वीज दरात सरासरी 5 टक्के एवढी वाढ केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 0 ते 100 युनिटपर्यंतचे दर जे पूर्वी 1 रुपये 90 पैसे होते, ते आता वाढवून 1 रुपये 95 पैसे करण्यात आले आहेत. ही वाढ 2.6 टक्के एवढी आहे. 101 ते 200 युनिटपर्यंतच्या वापरावर पूर्वी 2 रुपये 80 पैसे एवढे दर होते, ते आता 2 रुपये 90 पैसे असे केले आहेत. ही वाढ 3.6 टक्के एवढी आहे. 201 ते 300 युनिटपर्यंतचे दर पूर्वी 3 रुपये 70 पैसे एवढे होते, आता ते वाढवून 3 रुपये 90 पैसे केले आहेत. ही वाढ 5 टक्के एवढी आहे. 301 ते 400 युनिटपर्यंतच्या वापरासाठी पूर्वी 4 रुपये 90 पैसे दर होता, आता तो दर 5 रुपये 15 पैसे असा केला आहे. ही वाढ 5 टक्के आहे. 400 आणि त्यावरील युनिटवर 5 रुपये 8 पैसे असे दर होते, ते आता वाढवून 6 रुपये 20 पैसे असे केले आहेत. ही वाढ 6.9 टक्के एवढी आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.