क्षणचित्रं… प्राणचित्रं…
- प्रा. रमेश सप्रे
काही सन्माननीय अपवाद सोडले तर वेळ पाळणे बहुसंख्य लोकांना जमत नाही. त्याचा ताण मात्र मनात वाढत जातो. इतका की ‘वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा’ म्हणजे त्या वाढत जाणाऱ्या ताणाचा आपल्या मनोरचनेवर परिणाम होतो.
“गेले गं न्यायाधीश आपल्या दारासमोरून. म्हणजे नऊ वाजून पन्नास मिनिटं झालीयत. आपलं घड्याळ लाव पाहू…” असं दामोदरपंतांनी सांगितल्यावर रमाबाईंचे उद्गार, “मी लावलंसुद्धा!” अशा अत्यंत वक्तशीर न्यायमूर्तींना त्यावेळचे वाचकप्रिय लेखक अनंत काणेकर यांनी ‘घड्याळाचे गुलाम’ म्हटलंय. यंत्रासारख्या काटेकोर शिस्तीचे त्यांना कौतुक वाटत नाही. खरेच आहे ते! सहजपणे शिस्तपालन केले तर जीवनातील उत्स्फूर्तता नष्ट होत नाही. असो.
अशाच वृत्ती-प्रवृत्तीचं दुसरं एक मॉडेल. सरकारी यंत्रणेतले एक खूप वरच्या पदावरचे अधिकारी अभिमानाने सांगत, “माझं कसं सारं अगदी वेळच्या वेळी. सायंकाळी फिरून परततो तेव्हा घराचं फाटक (गेट) उघडताना समोरच्या मंदिरात गणेशाच्या आरतीचं रोज दुसरं कडवं सुरू असतं. ‘रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा’ हे शब्द ऐकतच मी घरात प्रवेश करतो.” त्यांना विचारलं, “एकदाही आरती संपेपर्यंत मंदिरात जरी नाही, मंदिरासमोर तरी उभं राहावं असं नाही वाटत? अगदी अंगारकी संकष्टीच्या दिवशीसुद्धा? तुम्ही स्वतः गणेशभक्त आहात म्हणून विचारतो.” यावर त्यांचे अगतिक उत्तर, “नाही, वेळेत बसत नाही. सायंकाळी सातच्या बातम्या ऐकायच्या असतात ना!” निवृत्त झाल्यानंतरही इतका अलवचीक दिनक्रम पाळणाऱ्या त्या अधिकाऱ्याला नमस्कार नि त्यांच्या वतीने श्रीगणेशाला प्रणाम!
मनावरचा किंवा मनातला ताण निर्माण व्हायला जे ‘चार डब्ल्यू’ सांगितले जातात ते-
वॉच-वेल्थ-वाइन-वुमन (म्हणजे अतिरिका कामवासना). यात ‘वॉच’ म्हणजे घड्याळाचा क्रमांक पहिला आहे. आपण ‘वेळेचे व्यवस्थान’ असा अत्यंत फसवा शब्दप्रयोग वापरतो- ‘टाईम मॅनेजमेंट!’ विचार करूया- टाईमला म्हणजे काळाला ‘मॅनेज’ करण्याइतके सामर्थ्य नि कौशल्य आहे आपल्यात? आपण काळाचा विचार करून आपली दैनंदिनी नि महत्त्वाचे कार्यक्रम आखायचे असतात. त्यांच्या यशस्वी होण्यात मुख्य घटक ‘काळ’ (टाइम) हाच असतो. त्यावर खरोखरच आपलं नियंत्रण नसतं. पण आपण मात्र तावातावाने स्वतःच्या ‘टाइम मॅनेजमेंट’चा डंका पिटत असतो. काही सन्माननीय अपवाद सोडले तर वेळ पाळणे बहुसंख्य लोकांना जमत नाही. त्याचा ताण मात्र मनात वाढत जातो. इतका की ‘वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा’ म्हणजे त्या वाढत जाणाऱ्या ताणाचा आपल्या मनोरचनेवर परिणाम होतो. आपण मानसरोगी बनण्याची शक्यता असते.
याच पार्श्वभूमीवर डॉ. दीपक चोप्रा या अमेरिकास्थित आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांचे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे नावच मोठे अर्थपूर्ण आहे- एजलेस् बॉडी. अगदी सत्तरीतले आजी-आजोबा आपली वेशभूषा, शरीराचे हावभाव, भाषा इ. गोष्टीतून सांगत असतात- ‘अभी तो हम जवान हैं।’ पण अशा सदाहरित (एव्हरग्रीन) तारुण्यासाठी औषधे, व्यायाम, आहार याहूनही अधिक महत्त्वाचे असते ‘टाइमलेस माइंड’ म्हणजे काळवेळेच्या दडपणातून मुक्त असलेले खुले खेळते मन. वेळ पाळण्याचे अतिवेड काहीजणांना असते. इतके की ट्रॅफिक जॅममुळे पाच मिनिटे उशीर झाला की ही माणसे स्वतः जॅम होतात. बेजार होतात. बिच्चारे!
काळाच्या चौकटीत राहूनही बऱ्यापैकी शांत-स्वस्थ राहता येते याची जाणीवच जरा वेळ चुकली, उशीर झाला की अशांत-अस्वस्थ होणाऱ्या व्यक्तींना नसते. असो.
जिवावरच्या हृदयाच्या धक्क्यातून वाचलेल्या नि त्याकाळात आत्मचिंतन करून स्वतःचं जीवन संपूर्ण बदलणाऱ्या जगप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांचे काळ-काम-वेग (पूर्वी अंकगणितात- ॲरिथमॅटिक- यावर आधारित जाम अवघड गणिते असायची) याचे स्वतःचे अनुभव कथन अतिशय मार्मिक नि बोलके आहे. एक दिवस तो मनगटावरचे घड्याळ घालायला विसरतो. परत जाऊन घड्याळ आणणे त्याला सहज शक्य होते, पण त्याने विचार केला, आपल्या आतही एक घड्याळ आहे की! आतल्या अंदाजाने साधारण वेळ समजेल नि वेळेवर आपण सर्व ठिकाणी पोहोचू (तसे मोबाईलवर घड्याळ असतेच की!). तसेच होते नि रात्री झोपताना दिवसाचा सर्व प्रवास आठवून तो म्हणतो- ‘आज घड्याळ नव्हतं तेव्हा मला सतत वाटत होतं की मी ‘ह्यूमन बीइंग’ आहे. इतकी वर्षं घड्याळाकडं पाहत मी फक्त एकामागून एक कामं करणारा ‘ह्यूमन डुइंग’ होतो.’ याचा अर्थ घड्याळ वापरायचं नाही असा नाही, पण आतल्या घड्याळाचा (बायोक्लॉक) उपयोग करायचा.
एक गमतीदार किस्सा सांगण्यासारखा आहे. एका वक्ताचं भाषण खूपच लांबतं. त्यामुळे कंटाळलेले श्रोते एकमेकांना म्हणतात, “ही हॅज फिनश्ड, बट नॉट् स्टॉप्ड!” म्हणजे त्याचा विषय सांगून झालाय, फक्त तो थांबत नाहीये. बोलतच राहिलाय. अखेर शेवटी एकदाचा थांबला. थांबताना म्हणाला, “मी बोलतच राहिलो, वेळ किती झाला हे कळलंच नाही. कारण समोर घड्याळ नव्हतं ना!’ त्याच क्षणी श्रोत्यांतून एक मिस्कील आवाज आला, ‘घड्याळ नव्हतं पण कॅलेंडर होतं की!’ असो.
परवा एकानं सांगितलं, “या वर्षी श्रावण महिना ‘अधिक’ आल्यानं नेहमीचा चार महिन्यांचा चातुर्मास पाच महिन्यांचा झालाय. काही संकल्प करायचा असेल, एकच करूया- ‘हे पाच महिने मी पाच वर्षांइतके संथ, शांत, सहज रीतीनं जगेन. प्रत्येक काम ज्या गतीनं करतो (खरं म्हणजे कसंही उरकतो) ती गती कमी करायची. पृथ्वीचं भ्रमण (फिरती) नि घड्याळाच्या काट्यांची गती नेहमीचीच असेल, पण प्रत्येक काम मी अगदी जाणीवपूर्वक संथपणे, शांतपणे करीन. स्वतःला ताण जाणवणार नाही, इतरांच्यात तणाव निर्माण होणार नाही अशी कामं केली तर अगदी आरामात जगता येईल. एका कवितेत म्हटलंय त्याप्रमाणे ‘फुलपाखरांच्या पंखावरची दिव्य नक्षी मी पाहीन. दवभरल्या सकाळी उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात मोत्यांप्रमाणे चमकणाऱ्या दवबिंदूंची नजाकत (नाजूकपणा) मी त्यांना स्पर्श न करता अनुभवीन. मंदिरातील घंटानादाच्या दूर दूर पसरत जाणाऱ्या ध्वनिलहरींचा आस्वाद मी घेईन. कारण मला भरपूर वेळ असेल.’ थोडक्यात घड्याळाचे गुलाम होण्याऐवजी स्वामी झालो तर याच जीवनात आपल्याला ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’चा साक्षात्कार होईल. घेऊया ना असा अनुभव नि करूया ना असा संकल्प?’