ग्रेसमय होताना…

0
9
  • शर्वरी भूषण भावे

ग्रेसांचा पाऊस इतर बहुतांश कवींप्रमाणे सुखाची अनुभूती देणारा नाही तर दु:खाची संवेदना चेतवणारा आहे. जीवनातील अतर्क्यतेचे तो सूचन करतो. ग्रेस यांची कविता मनाच्या गूढ व अबोध अवस्थेतून जन्माला येते. आत्मनिष्ठ अनुभवांतून त्यांची कविता आकार घेत असल्याने त्यांच्या काव्यात एक प्रकारची दुर्बोधता येताना दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेतील पाऊस मनाची झालेली कालवाकालव, अस्वस्थता यांचे सूचन करण्यासाठी येतो.

पावसाळा प्रत्येकाचे मन रिझवणारा असतो. पाऊस आपल्याला मनसोक्त भिजायला, आठवणींना कुरवाळायला आणि क्षणांना जपायला शिकवतो. प्रत्येकासाठी पाऊस हा खास असतो. पाऊस आपल्याला विविध रूपांमध्ये दिसतो. प्रत्येक रूप हे तेवढेच मोहक असते. एकूणच पाहता हा सृजनाचा काळ असतो.

अनेक कवींनी पावसाचे वर्णन आपल्या काव्यातून केले आहे. बहुतेक कवींसाठी पाऊस हा प्रत्यक्षातील असतो. पण मोजक्याच काही कवींचा पाऊस मनात मळब दाटून आल्यावर धुवांधार बरसणारा असतो. ग्रेसांचाही पाऊस असाच…
कवी ग्रेस म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे. त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून पावसाचे वर्णन केले आहे. परंतु ग्रेस यांचा पाऊस हा त्यांच्या अंतर्मनातील कल्लोळ व्यक्त करणारा असतो. तो गतस्मृतींचे अनेक पदर उलगडत येतो. ग्रेसांचा पाऊस इतर बहुतांश कवींप्रमाणे सुखाची अनुभूती देणारा नाही तर दु:खाची संवेदना चेतवणारा आहे. जीवनातील अतर्क्यतेचे तो सूचन करतो. ग्रेस यांची कविता मनाच्या गूढ व अबोध अवस्थेतून जन्माला येते. आत्मनिष्ठ अनुभवांतून त्यांची कविता आकार घेत असल्याने त्यांच्या काव्यात एक प्रकारची दुर्बोधता येताना दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेतील पाऊस मनाची झालेली कालवाकालव, अस्वस्थता यांचे सूचन करण्यासाठी येतो.

ग्रेस यांची ‘पाऊस’ ही कविता या दृष्टीने अभ्यासनीय आहे.
पाऊस कधींचा पडतो झांडाची हलती पानें;
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुरानें.
डोळ्यांत उतरलें पाणी पाण्यावर डोळे फिरती;
रक्ताचा उडला पारा… या नितळ उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला…
संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा;
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा!
या काव्यपंक्तीमधून कवीने आठवणीत सतत रेंगाळणाऱ्या आपल्या मनाची व्यथा मांडली आहे. आपल्या आठवणी या पावसासारख्याच क्षणिक असतात. त्यांची हमी देता येत नाही. पाऊस अनेक आठवणींना उजाळा देण्यास आपल्याला भाग पाडत असतो. आपण कितीही या आठवणींना विसरण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात ते शक्य नसते. कारण या आठवणी तशाच खास असतात. या आठवणींनी तत्क्षणी का होईना पण आपल्या मनाला भुलवलेले असते. आठवणी मनाला अस्वस्थ करणाऱ्या असतात. याच आठवणींचे स्पंदन कविमनाला अस्वस्थ करीत आहे. यामुळेच या पावसाच्या सततच्या बरसण्यामुळे कविमनाची घालमेल क्षणाक्षणाला वाढत आहे. निसर्गाच्या रंगरूपांमध्ये या बरसातीने एक वेगळीच मोहमाया चढवली आहे. पण कविमनाचा खेळ मात्र स्वत्वातील सावल्यांशी सुरू आहे. मन दु:खी असल्याने सभोवतालचे वातावरणही ताजे टवटवीत, हरहुन्नरी न वाटता उदास आणि दु:खमय झाले आहे. या बरसातीचा संबंध मानवी मनाशी आहे.

आठवणी या मनाला जाळ्यात अडकवणाऱ्या असतात. आठवणींमध्ये रमल्याने मनाला आनंदापेक्षा त्रासच होतो; पण या आठवणी सोडल्यास त्याच्याकडे जपून ठेवण्यासारखे बाकी काही राहत नाही. एका अर्थाने कविमनाची ही द्विधा अवस्था आहे. या आठवणींमुळे दु:खाला आणखीच पूर येतो. मनाची जखम ओली अन्‌‍ वाहती होते. अश्रूंच्या रूपाने ती भळभळते. या अश्रूंमुळे मनही हलके होते. हा दु:खमय सूर कविमनात सर्वत्र पसरला आहे. यामुळे रक्तही गतीने वाहत आहे असे वाटते. या आठवणींमुळे जीवनात अनेक चढ-उतार आले आहेत. एक प्रकारची अस्थिरता आली आहे. मनाची ही अस्वस्थता सर्वांगाला मारक आणि बाधक ठरणारी आहे. यामुळेच ही उतरण मात्र नितळ भासते. पावसाने मनुष्याला बिनधास्त बरसणे, ओघळणे मात्र पुरेपूर शिकवले आहे. या उदास, दु:खमय आठवणींनी त्रासलेला, पिडलेला जीव जेव्हा मुक्तपणे बरसतो तेव्हा ही उतरणसुद्धा नितळ, निव्वळ अन्‌‍ शुद्ध होते.
कविमन अस्वस्थ, बधिर झाल्याने यातून त्याची लवकर सुटका होत नाही. या तिमिराच्या भोवऱ्यातून सावरायला आणि स्वत:ला आवरायला बराच वेळ जाऊ द्यावा लागतो. कवी परस्परविरोधी संकल्पनांची गुंफण घालून एक वेगळाच कलात्मक अनुभव रसिकांना देतो. शुभ्र फुलांनी गुंफलेली जरी असली तरी ती ज्वाला आहे. सर्वांगाची यामुळे लाही लाही होणे हेच सत्य आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावर भटकताना आलेल्या अश्रूंनी पुन्हा एक तेजाचा कण अंतर्मनात पसरला आहे हा केवळ एक समज आहे. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नसून पावसाच्या कोसळण्याने मनाला चिंतेचे अन्‌‍ उदासीनतेचे पाझर फुटले आहेत. ताऱ्यांचा प्रहर म्हणजे संध्याकाळ. एकूणच आयुष्याच्या उतारवयातला अनुभव कवी सांगतो असे वाटते. आयुष्याच्या उतारवयात अनुभवांची गर्दी मनात घर करून बसते. म्हणूनच हा अनुभव जीवनाच्या संध्यासमयीचा आहे असे म्हणता येते. यातूनच एकप्रकारचे दीर्घत्व, प्राचीनत्व, जीवनाला लागलेली सल स्पष्ट होते. म्हणूनच ‘पाऊस कधीचा पडतो’ असे कवी म्हणतो. यातून पावसाची दीर्घकाळापासून सतत बरसण्याची क्रिया स्पष्ट होते. एकूणच सुख आणि दु:ख यातले द्वंद्व कवीला स्पष्ट करायचे आहे.

या आठवणींच्या मायाजालात कविमन पूर्णपणे अडकले, गुरफटलेले आहे आणि अश्रूंना वाहते करण्याखेरीज कोणताही मार्ग नाही. डोळेही अश्रूंनी डबडबलेले आहेत. यामुळे समोर दिसणारी घरेही धूसर झाली आहेत. एकूणच स्पष्टतेचा लवलेश नाही. संदिग्ध घरांच्या ओळी कवीला दिसतात. वातावरणात गारवा येत आहे. या भिजण्यापासून सुटका नाही. ‘आकाश ढवळतो वारा’ यातून जीवनात आलेल्या पोकळीचे चित्रण कवी करतो. आकाश म्हणजेच अवकाश, जीवनातील रितेपण. या रितेपणात मनुष्याच्या सांगाती या केवळ त्याच्या आठवणीच आहेत.

‘माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा’ यामधून कवी सांगू पाहतो की आपल्या आठवणी या लाटांसारख्याच असतात. किनाऱ्यापर्यंत येणे आणि फुटणे हा लाटांचा धर्म आहे. किनारा ही थांबण्याची, विसाव्याची जागा आहे. लाटांप्रमाणेच आठवणी या अचानक येऊन मनावर आदळतात. मनुष्य हा आठवणींनी साचलेला असतो. या आठवणींचा मारा त्याच्यावर सतत होत असतो.

अशाप्रकारे आशयाचा उत्कर्ष या कवितेने गाठला आहे. जीवनाचा प्रदीर्घ अनुभव, अतर्क्य तत्त्वज्ञान याबाबतचा विचार मांडला आहे. शेवटी आठवणीच माणसाला सोबत करतात असा आशय कवीने स्पष्ट केला आहे.
या कवितेचे रूप पाहता ते संदिग्ध, अस्पष्ट आहे. तुटक-तुटक अनुभवांचे एकत्रीकरण या कवितेत दिसते. ज्याप्रमाणे मनातील विचार हे कोणत्याही ठराविक क्रमाने येत नाहीत, तशीच काहीशी ही कविता आहे. मनातील विचार हे पावसासारखेच कोसळतात. तशी काहीशी ही कविता स्फुरलेली दिसते. या कवितेला तार्किक रूप नाही.
या कवितेत अंतर्विरोध ठसठसून भरलेला आहे. हा अंतर्विरोध प्रतिमा-प्रतीकांच्या माध्यमातून साधला आहे. ग्रेस यांची कविता ही या परस्परविरोधी संकल्पनांमधून सुवर्णमध्य साधणारी आहे. कवितेची सुरुवात पाहता ‘पाऊस कधींचा पडतो’ या ओळी वाचल्यानंतर कवितेत सुखद अनुभव मांडले आहेत असे भासते. पण लगेचच हलकेच ‘जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’ या पंक्तीमधून हा भ्रम दूर होतो.

प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै या ग्रेस यांच्या कवितेबद्दल मत व्यक्त करताना म्हणतात,
संध्याकाळच्या धूसर वातावरणात ग्रेसचे दु:ख फिरून फिरून जन्म घेते. संध्याकाळीच ही वेदना पुन: पुन्हा जागी होते, म्हणूनच या संध्याकाळच्या कविता.
पावसाळी क्षणांचा कविमनावर उमटणारा नाद किती वेगळा असू शकतो आणि त्यातून एका वेगळ्याच आशयाची एक अत्युत्तम कविता कशी निर्माण होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेसांची ही कविता.