>> सांताक्रुझ ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
नगर नियोजन मंडळाच्या सोमवार १९ मार्च रोजी होणार्या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रे वगळण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा, ६ एप्रिलरोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सांताक्रुज ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत काल दिला.
या पत्रकार परिषदेला ग्रामस्थ समितीचे आर्थुर डिसिल्वा, ओलासियो फर्नांडिस, रूडॉल्फ फर्नांडिस, रामा काणकोणकर, प्रकाश सावंत व इतरांची उपस्थिती होती.
ग्रेटर पणजी पीडीएच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोक भावनेची दखल घेऊन सांताक्रुज व इतर भाग न वगळल्यास येत्या ६ एप्रिल रोजी आंदोलन छेडले जाणार आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि माजी मंत्री मोन्सेरात जबाबदार राहणार आहेत, असा इशारा डिसिल्वा यांनी दिला.
राज्य सरकारने नवीन ग्रेटर पणजी पीडीएची स्थापना करून ताळगाव, कदंब पठार, बांबोळी पठार व आसपासच्या भागातील १४ गावांचा नवीन पीडीएमध्ये समावेश केला आहे. सांताक्रुझ, सांत आंद्रे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी आरल्या गावाचा पीडीएमध्ये समावेश करण्यास विरोध केला आहे.
स्थानिक लोकांच्या दबावामुळे सांताक्रुझचे आमदार ऍन्थोेनी फर्नांडिस यांना ग्रेटर पणजी पीडीएच्या सदस्यपदाचा राजिनामा द्यावा लागला. सरकारी खात्याने सांत आंद्रे मतदारसंघात ग्रेटर पणजी पीडीए प्रश्नी आयोजित जनसुनावणीत लोकांना पीडीएला विरोध करून सुनावणी बंदी पाडली. ग्रेटर पणजी पीडीएच्या प्रश्नावर माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. सरकारने पंचायत क्षेत्रातील लोकांना भावना विचारात घेऊन पंचायत क्षेत्रे वगळण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी डिसिल्वा यांनी केली. माजी मंत्री मोन्सेरात यांनी सांताकुझ मतदार संघाचे पाच वर्षे प्रतिनिधित्व केले. या पाच वर्षाच्या काळात मतदारसंघाचा विकास करण्यास अपयशी ठरले, असा आरोप डिसिल्वा यांनी केला. पीडीएच्या विरोधात लोक जागृतीसाठी विविध ठिकाणी बैठका घेतल्या जाणार आहेत. स्थानिक आमदार, सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्यांनी या बैठकांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रामा काणकोणकर यांनी केले.