गडकरी मंगळवारी गोव्यात

0
80

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी मंगळवार २० मार्च रोजी गोव्यात येणार असून सकाळी ११ वाजता पर्वरी येथील मंत्रालयात खाण व्याप्त भागातील आमदार, व्यावसायिकांची भेट घेऊन खाणबंदीबाबत चर्चा करणार आहेत.

राज्यातील खाण बंदीमुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. या खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची विनंती केंद्रीय मंत्री गडकरी यांना करण्यात आली आहे. खाण व्यावसायिक व खाण व्याप्त भागातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी, केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र तोमर यांना गोव्यात पाचारण करण्याची मागणी खाण व्यावसायिकांनी केली होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यावसायिकांचे मनोगत जाणून घेण्यासाठी गोव्यात येण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सार्वजनिक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

गुरूवारी नवी दिल्ली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन खाण बंदीमुळे निर्माण होणार्‍या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांची उपस्थिती होती. यापूर्वी मंगळवारी सुध्दा मंत्री ढवळीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

खाण लीज लिलावाला प्राधान्य
सरकारकडून खाण लिजाचा लिलाव करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. खाण लीज लिलाव प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहेत. त्याच बरोबर खाण बंदी पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे. खाण बंदीमुळे राज्याचा मोठा महसूल बुडणार आहे. तसेच खाण कामगारावर बेकारीची कुर्‍हाड येणार आहे. ट्रक मालक, बार्ज, यंत्रसामग्री मालकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी दिली.