ग्रामसभा कामकाजाचे चित्रीकरण होणार

0
103

>> अनुचित प्रकार रोखण्यासाठी सरकारचा निर्णय

 

राज्यातील ग्रामसभांमध्ये होत असलेल्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसभांच्या संपूर्ण कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामसभेत अनेकजण मते व्यक्त करतात, काहीजण विरोधातही मत व्यक्त करतात. या चित्रीकरणामुळे ते लक्ष्य होऊ शकतात, असे पत्रकारांनी सांगितले असता, प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने वागू शकतो. वरील कारणामुळे चित्रीकरण न करण्याचा निर्णय होऊ शकत नाही. अनेक ग्रामपंचायतींकडून चित्रीकरण व्हावे, अशी मागणी येत होती. चित्रीकरण केल्यानंतर ग्रामसभांच्या कामकाजाचे दस्तावेज अधिकृतपणे सांभाळणे शक्य होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले.
आरडीए कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतरचा लाभ
ग्रामीण विकास यंत्रणेतील निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना निवृत्ती नंतरचा लाभ देण्यासाठी १ एप्रिल २०१२ रोजी योजना तयार केली होती. पाच कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तो मिळावा म्हणून त्यांची मागणी होती. पाच पैकी एका निवृत्त कर्मचार्‍याचे निधनही झाले. परंतु वरील पाचही जणांना लाभ मिळवून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. निधन झालेल्या कर्मचार्‍यांचा लाभ त्याच्या नातेवाईकांना मिळेल, असे पार्सेकर यांनी सांगितले. बांबोळी येथील मनोरुग्णालयात ६ नवी प्राध्यापकांची पदे तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे तेथे नवे अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. मये, डिचोली येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये कंत्राटी तत्वावर २० कर्मचार्‍यांची पदे तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री
म्हणाले.
दंत महाविद्यालयातही प्राध्यापकांची ४ पदे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍यांची संख्या वाढू शकेल व नवे अभ्यासक्रमही सुरू करता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.