- श्रीरंग व्यंकटेश जांभळे
सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘विषमुक्त’ शेती आवश्यक असल्याच्या गोष्टीवर सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. कोणता प्रकार जास्त चांगला? कोणत्या पद्धतीचा फायदा अधिक अथवा कमी? या वादात न पडता पर्यावरणाला हानी न पोचवता विषमुक्त अन्न तयार करण्याचा विचार घेऊन आपण पुढे जाऊ!
‘ऑर्गेनिक’ हा शेती क्षेत्रातील परवलीचा शब्द होऊ पाहत आहे. मराठी भाषेत त्याचा अर्थ ‘सेंद्रिय’ असा आहे. सेंद्रिय शेतीसंदर्भातील काही तज्ज्ञांनी केलेल्या गहन चिंतनानुसार यातील विविध पद्धतींचा अवलंब शेती क्षेत्रात होताना दिसतो व त्यानुसार वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती अशा नावांनी वेगवेगळे प्रयोग सुरू असल्याचे लक्षात येते. यातील काही विशेष पद्धतींचे जनक आपली मते मांडताना दुसर्यांच्या मतांचे नेटाने खंडन करतानाही आढळतात. परंतु, रूढार्थाने सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा (खते, औषधे इ.) वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘विषमुक्त’ शेती आवश्यक असल्याच्या गोष्टीवर सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. कोणता प्रकार जास्त चांगला? कोणत्या पद्धतीचा फायदा अधिक अथवा कमी? या वादात न पडता पर्यावरणाला हानी न पोचवता विषमुक्त अन्न तयार करण्याचा विचार घेऊन आपण पुढे जाऊ.
भारतीय शेतीला ११,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. चारही वेद, उपनिषदे, विविध स्मृती यांत तत्कालीन शेतीचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातील ‘कृषिमित् कृषस्व’ हा संदेश शेतीचे महत्त्व अधोरेखित करतो. मानवी जीवनाच्या संस्कृती, सामाजिक सुधारणा या अंगांमध्ये शेती व शेतीचा विकास या पायाभूत गोष्टी आहेत. भारतीय परंपरांची श्रीमंती लक्षात घेता येथील शेती व शेतीचा विकास व समाजव्यवस्थेत विकसित होत गेलेले शेतीचे स्थान याचा अंदाज येतो. अगदी अलीकडच्या काळातील कौटिल्याच्या (चाणक्य) अर्थशास्त्रातील शेती, शेतीची व्यवस्था, शासन व समाजाची जबाबदारी याविषयीचे विवेचन अत्यंत मार्गदर्शक आहे. यात शेतीच्या व शेतकर्यांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून ‘सिताध्यक्ष’ (कृषी अधिकारी) याची कामेही नमूद केलेली आहेत. यातून जनतेचे भरण-पोषण करण्यासाठी शेतीचे महत्त्व लक्षात येते. उपलब्ध नैसर्गिक साधनांचे शोषण न करता, या साधनांचे संवर्धन करत कृषिकर्म करण्याने समाजाचा, राष्ट्राचा शाश्वत पद्धतीने विकास साधण्याकडे या सगळ्यांचा दिशानिर्देश आहे.
अन्नधान्य हे जीवन पुष्ट करण्यासाठी आहे. परंतु सर्वसाधारणपणे चालू शेतीपद्धतीतून निर्माण होणारे अन्न मानवाला व पशूंना निरोगी जीवन देऊ शकत नाही. उलट यामुळे रोगांचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष विविध प्रयोगांतून तज्ज्ञांनी पुढे आणले आहेत. आयुर्वेदानुसार चांगला/योग्य नियमित आहार निरामय/निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेता, विषमुक्त अन्न निर्माण करण्याची शेतकर्याची जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. फक्त अन्नधान्यच नव्हे तर जीवनात आवश्यक अनेक गोष्टी आपण शेतीतून मिळवतो. त्या टिकाऊ व फलदायी होण्यासाठी पर्यावरण अनुकूल सेंद्रिय शेतीपद्धत अवलंबणे फार महत्त्वाचे ठरते.
गोमंतभूमी नैसर्गिक संपन्नतेने नटलेली आहे; आणि म्हणूनच येथील जनसमुदाय श्रीमंत परंपरा व सुसंपन्न जीवनपद्धती असलेला आहे. काही वनस्पतींचे हे माहेरघरही आहे. येथे शेतीचा सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास आहे. गोव्याला परशुराम भूमी म्हटले जाते. राज्यात सुमारे १८,००० हेक्टरपेक्षा जास्त भूमी खाजन जमीन या नावाने परिचित आहे. खाड्यांच्या खार्या पाण्याच्या प्रभावाखाली असलेल्या या जमिनी आपल्या पूर्वजांनी स्वकष्टाने बांधबंदिस्ती करून शेतीयोग्य केल्या. पावसाळ्यात भातशेती, त्यानंतर भाजीपाला, बांधावर नारळ लागवड व पोयींतून मासे असे दैनंदिन गरजेसाठी लागणारे अन्नपदार्थ देणारी ही एकमेवाद्वितीय (पाणी हटवून लागवडीयोग्य बनवलेली) पद्धत गोव्यात आहे. या जमिनीतील लागवड बाहेरचे कोणतेही तथाकथित रासायनिक खत न देता केली जाते. फक्त नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेला सेंद्रिय शेतीपद्धतीचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
गोव्यातील कुळागरे व भाट ही संमिश्र शेतीची चांगली उदाहरणे आहेत. सुपारीच्या बागांमध्ये केळी, पपई, मिरी, जायफळ, सुरण, पानवेली यांची परंपरागत लागवड आहे. नारळाच्या बागेतही मिरी, जायफळ, केळी यांची लागवड आढळते. सध्या शास्त्रज्ञ ज्यावर भर देतात, ज्याचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा एकात्मिक पीकपद्धतीची (खपींशसीरींशव षरीाळपस ीूीींशा) ही शास्त्रोक्त उदाहरणे आहेत. डोंगरउतारावरील लागवडीत ओट्यांवर (ढशीीरलशी) केलेल्या लागवडीमुळे पाणी व माती संधारणाचे उद्दिष्ट साधले जाते. या बागा कष्टपूर्वक आपल्या अनेक पिढ्यांनी वाढवल्या व जतन केल्या आहेत. यातील जमिनीचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या तांत्रिक पद्धती पूर्वापार चालत आल्या आहेत. यासाठी शेणखत व हिरवळीच्या खताचा (ॠीशशप ारर्पीीश) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सर्व पिकांचे अवशेष- जसे सोडण, सुपारीच्या सोली, झावळ्या, पालापाचोळा इत्यादी- झाडालगतच जमिनीत कुजवला जातो. बागेतच खड्डा खणून (गायर) त्यात शेणखत कुजवून कंपोस्ट स्वरूपात त्याचा खत म्हणून वापर केला जातो. यामुळे येथील शेतमाल विषमुक्तच आहे. फणस, निरफणस, तोरिंग या झाडांनाही कोणी बाहेरून खत आणून घालीत नाहीत. ही फळे गोवेकरांची फारच आवडीची व नियमित वापरातील.
आंबे लागवड सघन आढळत नसली तरी इथल्या स्थानिक जाती अत्यंत विशिष्ट व महत्त्वाच्या आहेत. याला मीठ घालण्याचा प्रकार गोव्यात आढळतो. काजू लागवडीत फार अल्प शेतकरी खतांचा वापर करतात. टी मॉस्किटो व खोडकिड्यांच्या नियंत्रणासाठी काही ठिकाणी औषधांचा वापर होतो. पण सर्वसाधारणपणे गोव्यातील काजू सेंद्रिय म्हणूनच ओळखला जातो. काही निर्यातदार सेंद्रिय काजूची परदेशात निर्यातही करतात. आदर्श सहकारी संस्था व गोवा बागायतदार संस्थेतर्फे विशेष कार्यक्रम राबवून सेंद्रिय काजू खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जातो. याद्वारे काजू उत्पादकांना वाढीव दराचा लाभही मिळतो.
गोव्यात भातशेतीत मात्र युरिया व अन्य सिंथेटिक खतांचा वापर केला जातो. हा वापर किती करावा, कसा करावा याची बर्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे त्याचा योग्य वापर होण्याऐवजी खते वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. भाजीपाल्यातही या कृत्रिम खतांचा वापर होतो. याचा परिणाम म्हणून येणार्या कीड व रोगांवर उपाय म्हणून औषधांचा वापर होतो. तसेच काही ठिकाणी तणनाशकांचाही वापर केला जातो. यामुळे जमिनीतील जीवसृष्टीवर याचा विपरित परिणाम होतो. औषधांच्या वापरामुळे अन्य उपयोगी कीटक व प्राण्यांनाही जीव गमवावा लागल्याने अन्नसाखळी तुटून पर्यावरणीय असमतोल तयार होतो.
यासाठी शेतकर्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोचणे आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा वापर करून शेती करणार्यांनाही सेंद्रिय शेतीपद्धती शास्त्रीय दृष्टीने समजावून सांगणे आवश्यक आहे. शेणखत, पालापाचोळा व अन्य सेंद्रिय पदार्थ उघड्यावर उन्हात राहिल्यास कर्बाचे प्रमाण कमी होते, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे कर्ब उडून गेलेले खत घातल्यास मातीची प्रत सुधारण्यास त्याचा कोणताच उपयोग होत नाही. मिश्रखतांचा वापर, जमिनीवर आच्छादन पसरणे (र्चीश्रलहळपस), मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, पिकांचा फेरपालट, योग्यवेळी व आवश्यक तेवढेच पाणी पिकास देणे, पिकात दोन रोपे/झाडांमध्ये आवश्यक अंतर राखणे, जमिनीची योग्य मशागत करणे या व अशा अनेक गोष्टीही सेंद्रिय शेतीचाच भाग आहेत. याविषयी शेतकर्यांमध्ये जागृती केली पाहिजे. यातील बर्याच गोष्टी त्यांना माहीत असतात, पण त्यामागील कारणमीमांसा लक्षात आल्यास अभ्यासू दृष्टीने ते याचा वापर करतील.
परिस्थितीनुरूप व अडचणींमुळे शेतकर्यांकडचे गुरांचे प्रमाण आता कमी झाले आहे. परंतु शेण हे जमिनीतील सूक्ष्म जीवांचे अत्यंत महत्त्वाचे अन्न आहे. गायीच्या शेणात बरेच उपयुक्त जीवाणू असल्याचेही शास्त्र सांगते. स्फुरद, पालाश यांसारख्या अन्नद्रव्यांचे, मातीत झालेल्या स्थिरीकरणाचा गुंता सोडवून ते पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम हे सूक्ष्म जीव करतात. तसेच जमिनीचा मगदूर सुधारणे, मातीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारणे यात या सूक्ष्म जीवांचा अनमोल वाटा आहे. तसेच गोमूत्र, गोमय (शेण), दूध, तूप, दही यांपासून अनेक सेंद्रिय निविष्टा घरच्या घरी तयार करून वापरता येतात. या पदार्थांच्या वापराने पिकाची गुणवत्ताही वाढत असल्याचे शास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झाले आहे. जीवामृत, बीजामृत, पंचगव्य असे अनेक पदार्थ बनवण्याच्या कृती शेतकर्यांनी अवलंबल्या पाहिजेत. कीड व रोगांवर उपाय करण्यासाठी दशपर्णी अर्क, विविध सापळे यांचा उपयोग होऊ शकतो. परंतु कोणत्या कीड व रोगावर कोणता उपाय करावा, याची शास्त्राधारित माहिती शेतकर्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे.
देशात सिक्कीमने पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मान मिळवला. गोवा राज्याचा आकार व येथील शेतीपद्धतीची परंपरा लक्षात घेता, गोव्याला दुसरा क्रमांक मिळू शकतो. परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात ५०० क्लस्टरमधून काम सुरू झाले आहे. या योजनेतून शेतकर्यांना सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षण, सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणिकरण व सेंद्रिय शेतीतील उत्पादन म्हणून विक्री असे लाभ मिळणार आहेत. या योजनेच्या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर याची व सेंद्रिय शेतीपद्धतीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. या योजनेची उद्दिष्टे फारच विचारपूर्वक व चांगल्या प्रकारे तयार केली आहेत. यात शासकीय यंत्रणा, क्रियान्वयन करणार्या संस्था व शेतकरी यांनी योग्य पद्धतीने व नेमून दिलेली जबाबदारी पार पाडल्यास नक्कीच विषमुक्त शेतीचा झेंडा मिरवता येईल.
राज्य सरकारने सेंद्रिय कृषी विद्यापीठाचे सुतोवाच केले होते, परंतु हा विषय पुढे जात असल्याचे जाणवत नाही. राज्यात शेतीविषयक शिक्षण देणारी चार उच्च माध्यमिक विद्यालये व दोन महाविद्यालये आहेत. त्यातून नव्या दमाचे, नवीन तंत्रज्ञान घेऊन शेतीची पताका अखंड फडकवत ठेवणारे तरुण बाहेर पडू शकतात. शेतकर्यांसाठीही (कृषी विज्ञान केंद्र व शासकीय यंत्रणा यांच्यासोबतच) ही विद्यालये प्रशिक्षणाची केंद्रे म्हणून पुढे येऊ शकतात. परंतु या विद्यालयांना स्वयंपूर्ण होण्यासाठी निधी/अनुदान देण्यास सरकारी पातळीवर कोणतीच हालचाल होत नाही. तसेच शेतीविषयक कोणतेही धोरण न आखता फक्त कार्यक्रम राबवण्याने या क्षेत्राचा सम्यक व शाश्वत विकास शक्य नाही, हे राजकीय व प्रशासनातील धुरिणांनी लक्षात घेऊन पावले टाकायला हवीत. सिक्कीमला सेंद्रिय राज्य घोषित केल्यानंतर शेतकर्यांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले. या अडचणी टाळण्यासाठी व राज्याचा सेंद्रिय शेतीच्या विकासासाठीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. सेंद्रिय शेतीचे यशस्वी-अयशस्वी प्रयोग करणार्यांनीही या वाटचालीत महत्त्वाचे योगदान द्यावे व सर्व स्तरावर मार्गदर्शन करावे. संशोधकांनी या गोष्टींना शास्त्राचा योग्य आधार देऊन योग्य निष्कर्ष समाजासमोर आणावेत.