- नीता महाजन
(जुने गोवे- खोर्ली)
जिजाऊने स्वतःच्या कल्पनेने शिवबाच्या मनात स्वराज्याचं बी रुजवलं. शिवबाला असामान्य असा राजा बनण्याचं प्रशिक्षण दिलं. या गोष्टीतून दिसून येतं की प्रत्येक आईमध्ये ही क्षमता असते, आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्याची. फक्त ही ऊर्जा स्वयंप्रेरणेने बाहेर आली पाहिजे.
हिरकणीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत असेलच. हिरकणी ही शिवाजीच्या काळातील एक साधीभोळी सर्वसामान्य अशी गवळण. नियमित गडावर दूध विकायला जाणारी. अशीच एक दिवस ती गडावर दूध घेऊन गेली होती. त्या दिवशी तिला परतायला जरा उशीर झाला होता. रोजच्या नियमाप्रमाणे ठरावीक वेळेला गडाचे दरवाजे बंद झाले होते. हे दरवाजे संध्याकाळी एकदा बंद झाले की दुसर्या दिवशी सकाळीच उघडत असत. आता रात्रभर गडावर कसं राहायचं? माझ्या तान्ह्या बाळाचं काय होईल?… या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले. तिचा जीव व्याकूळ झाला. तिने शिपायांची अनेक आर्जवे केलीत. पण तेही ठाम होते. गडाचा नियम ते मोडू शकत नव्हते. तिने मनाशी पक्का निर्णय करून तो गड उतरायचे ठरवले व तो कठीण असा गड उतरून ती आपल्या तान्ह्या बाळापाशी पोचली. तो कडा उतरताना तिला फक्त तिचं तान्हं बाळ दिसत होतं.
शिवाजी महाराजांना तिच्या धाडसाची ही बातमी कळताच त्यांनी त्या गवळणीचा सन्मान केला व ज्या ठिकाणाहून तो कठीण असा कडा ती उतरली होती त्याला ‘हिरकणीचा बुरूज’ असं नाव देण्यात आलं.
मनात इच्छाशक्ती, जिद्द, प्रेरणा, ऊर्जा असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटावर मात करू शकतो. अनेक अडथळे पार करत आपले ध्येय गाठू शकतो. काही दिवसांपूर्वी अशीच एक हिरकणी गवसली म्हणून हा लेखन प्रपंच. ते पाहून मनात विचार आला की किती कमकुवत मनाचे आहोत आपण! मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की अगदी निराश होतो. पण या हिरकणीची गोष्ट ऐकली, तिचा प्रवास पाहिला आणि मन भारावून गेले.
यु-ट्यूबवर ड्रिमिंग क्रिएशन या वाहिनीने ‘हिरकणी ः गोष्ट एका प्रवासाची’ असं सदर सुरू केलं आहे. ज्यामध्ये एका सामान्य स्त्रीचा असामान्य असा प्रवास उलगडत जातो. सौ. सविता देसाई यांच्या कर्तृत्वाचे दर्शन यातून घडले.
… सविताताई अगदी सामान्य पण संस्कारांनी समृद्ध अशा घराण्यात जन्माला आल्या. एक सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व आईवडिलांच्या संस्कारांनी समृद्ध, ज्या संस्कारांची शिदोरी आजही त्या जपत आहेत. त्या संस्कारांची मुळे आजही अगदी या मातीत घट्ट रुजली आहेत. आपल्या आयुष्यात घडणार्या घटना, प्रसंग किंवा परिस्थिती माणसाला पूर्णतः बदलवून टाकते. सविताताईंच्या बाबतीतही असंच घडलं. एक सकारात्मक ऊर्जा, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मनाला खूप भावलं.
सविताताईंचं शिक्षण मडगाव येथे झालं. नंतर लग्न झालं. सतत काहीतरी करत राहायचं हा त्यांचा स्वभाव. म्हणून त्यांनी काही वर्षे पाळणाघर चालवलं. त्यांच्या मनात समाजाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे आणि हाच त्यांचा गुण आयुष्याच्या प्रवासात त्यांना साथ देणारा ठरला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आले. अगदी नाजूक फुलासारखी म्हणून ‘प्राजक्ता’ असे नाव ठेवले. प्राजक्ता हळुहळू मोठी होऊ लागली. परंतु सविताताईंच्या लक्षात आले की आपले बाळ सामान्य नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे. त्यांनी अनेक डॉक्टरांकडे तिला दाखवले. पण नेमका काय आजार आहे हे कुणी सांगू शकले नाही. शेवटी काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सविताताईंनी प्राजक्ताला उपचारासाठी मुंबईला नेले. तिथल्या डॉक्टरांनी तिला डाऊन सिंड्रोम असल्याचे निदान केले. तिला कसं सांभाळायचं हे एका डॉक्टरने थोडक्यात तिला सांगितले. मनाने न खचता सविताताईंनी प्राजक्ताला सांभाळायला सुरुवात केली. नंतर त्यांनी तिच्या उपचारासाठी, तिला कसं सांभाळावं याचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्या पुण्याला स्थायिक झाल्या. मुलीच्या भविष्यासाठी न डगमगता त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यांच्यामधल्या ‘आई’ने त्यांना पूर्ण साथ दिली व त्यांनी आपल्या या दिव्यांग मुलीचे पालनपोषण करण्यास सुरुवात केली. त्यांना असं वाटायचं की आपली मुलगी कुठेही कमी पडता कामा नये. म्हणून त्यांनी तिला ‘भरतनाट्यम् नृत्याच्या’ वर्गात घातलं. प्राजक्ताही ते आवडीने शिकू लागली. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सविताताईंनी तिला प्रेरणा दिली. त्या तिला जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे घेऊन जायच्या. प्राजक्ताला अनेक बक्षिसं मिळालीत. तिनेही अगदी राष्ट्रीय पातळीवरील भरतनाट्यम्च्या स्पर्धेत मजल मारली. यामागे होती सविताताईंची जबरदस्त इच्छाशक्ती. ‘आई’ म्हणून त्या कधीच कुठेच कमी पडल्या नाहीत. हे त्यांचं आईपण, त्यांची जिद्द खरंच विचारप्रवृत्त करून गेली की आज समाजात अशा किती आया आहेत, ज्या असा विचार करतात? मी एक शिक्षिका असल्यामुळे माझा अनेक पालकांशी संबंध येतो. त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांना मुलं म्हणजे नकोशी वाटतात. वैताग वाटतात. कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे अनेक पालकांचा हाच सूर आहे की मुलं वैताग आणतात. सतत टीव्ही, मोबाइलमध्ये गुंतलेली असतात. अशा पालकांनी आपल्या मुलांना काहीतरी वेगळ्या उपक्रमात गुंतवण्यासाठी धडपडले पाहिजे. पण त्यांना वेळच नसतो.
सविताताईंनी मात्र निराश न होता, अनेक अडचणींवर मात करत, असामान्य कामगिरी केली. त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवता ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ या दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी ज्ञानदानाचं कार्य केलं. प्राजक्ताला मात्र जास्त आयुष्य लाभलं नाही. परंतु सविताताई हरल्या नाही की नशीबाला दोष देत बसल्या नाही. त्यांनी या शाळेतील मुलांमध्येच आपल्या प्राजक्ताला पाहिलं. जबरदस्त इच्छाशक्ती व श्रीविजयादुर्गेवर असलेल्या निस्सिम भक्तीने त्या आपले कार्य करीत राहिल्या व आजही त्याच ऊर्जेने करीत आहेत. याच कर्तृत्वाने त्या ‘हिरकणी’ ठरल्या.
सहज एक विचार डोक्यात येऊन गेला की जर त्यांचं मूल सुदृढ, निरोगी असतं तर त्यांनी काय केलं असतं? … एकतर सर्वांसारखंच मुलीचं संगोपन केलं असतं व प्राजक्ता गोव्याच्या गर्दीचाच एक भाग झाली असती किंवा सविताताईंच्या जन्मजात पिंडाने तिला उच्चतम शास्त्रीय नृत्यकलेचे शिक्षण दिले असते व ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची नृत्यांगना झाली असती.
असं जर असेल तर जिजाऊसाठी शिवबामध्ये कसलं व्यंग होतं? शिवबा तर सुदृढ असा सरदाराचा पुत्र होता. त्यांचा लौकिक होता. पण जिजाऊने स्वतःच्या कल्पनेने शिवबाच्या मनात स्वराज्याचं बी रुजवलं. शिवबाला असामान्य असा राजा बनण्याचं प्रशिक्षण दिलं. या गोष्टीतून दिसून येतं की प्रत्येक आईमध्ये ही क्षमता असते, आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्याची. फक्त ही ऊर्जा स्वयंप्रेरणेने बाहेर आली पाहिजे.
हिरकणीला गरज होती कडा सर करण्याची, मात्र जिजाऊने अदृश्य कडा सर केला म्हणूनच तर शिवबा छत्रपती शिवाजी झाला.
सविताताईंमधील ही ऊर्जा खरंच आम्हा सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. दिव्यांग अपत्याच्या पालकांसाठी तर त्या जणू आधारस्तंभच आहेत, नव्हे सर्वांसाठीच आधारस्तंभ आहेत.