>> वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारचा निर्णय; दिल्ली, गुजरात राजस्थानचाही समावेश
गोवा, गुजरात, राजस्थान तसेच दिल्लीतून महाराष्ट्रात जाणार्या प्रवाशांपाशी कोविड चाचणी नकारात्मक आल्याचा दाखला असेल तरच प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने काल घेतला. रस्त्याने येणार्या किंवा विमाने व रेल्वे प्रवाशांना ही सक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात दिवाळीच्या सणानंतर पुन्हा एकवार कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले असून त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात राज्यांतून येणार्या प्रवाशांना कोविड चाचणी नकारात्मक आल्याचा दाखला सादर केला तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळेल. मुंबईला जाणार्या विमानांमध्ये चढण्यापूर्वी कोविड नकारात्मक चाचणी आल्याचा दाखला सादर करावा लागेल. हा नवा नियम २५ नोव्हेंबरपासून लागू होईल. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये मंडी, शिमला, कुलू आणि कांगडामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान ती लागू असेल.