गोव्याच्या किनारपट्टीसह कोकणातही आज दि. १८ रोजी वादळी पाऊस व लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग असलेल्या मालवण ते वसई (महाराष्ट्र) तसेच वेंगुर्ला (महाराष्ट्र) ते वास्को (गोवा) दरम्यानच्या किनारपट्टीवर आज दि. १८ रोजीपर्यत वादळी लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मालवण ते वसई दरम्यानच्या किनारपट्टीवर २.५ ते ३.२ मीटरपर्यंतच्या लाटा उसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
२१ पर्यंत पावसाचा इशारा
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली असून पिवळा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी १८ रोजीपर्यत समुद्रात जाऊ नये. असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.