गोव्याला सर्व ते सहकार्य

0
105

>> केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्याकडून प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांचे गोव्याच्या सुरक्षेवर विशेष लक्ष आहे. केंद्राकडून गोव्याला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याने केंद्राने तिरंगा यात्रेचे आयोजन करून प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळ्या भागात पाठविले होते. त्याचा भाग म्हणूनच केंद्रीय मंत्री अहिर गोव्यात आले होते. आपण या दौर्‍यात गोव्यातील अनेक भागांना भेटी दिल्या. स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर विभूतींनी बलिदान केले, त्यांच्या इतिहासाची पाने जिवंत ठेवली पाहिजे, ही पंतप्रधानांची धारणा आहे, असेही त्यांनी सांगितले. काश्मीरातील ३७० वे कलम रद्द करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते, हे खरे आहे. परंतु त्यावर सरकार योग्यवेळी निर्णय घेईल, असे सांगून त्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम चालू आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. दलितांवर होणारे अत्याचार कमी करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न चालूच आहे, असेही त्यांनी सांगितले. गोमांसाची निर्यात आपल्या सरकारच्या काळातच सुरू झालेली नाही. ती पूर्वीपासून सुरू आहे, असेही ते एका प्रश्‍नावर म्हणाले. पाकिस्तान व चीनची भारतावर वक्रदृष्टी आहे. त्यामुळेच देशाच्या हद्दीवर सैनिकांना ठेवावे लागतात, असेही ते म्हणाले. परस्परांच्या मनात विश्‍वासाची भावना निर्माण होण्याची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून पंतप्रधान जगभरातील देशांना भेटी देत असल्याचे अहिर यांनी सांगितले.