>> कोसंबी विचार महोत्सवात करनाम मल्लेश्वरीकडून इच्छा व्यक्त
गोव्यातील युवा वर्गात क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व साधन सुविधा उपलब्ध केल्यास क्रीडा क्षेत्रात गोव्याला उज्वल भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ माजी भारतीय वेटलिफ्टर पद्मश्री डॉ. करनाम मल्लेश्वरी यांनी येथे काल केले. वेटलिफ्टिंगमध्ये गोव्याला मदत करण्याची मल्लेश्वरीने तयारी दाखवली.
गोवा कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित १३ व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. मल्लेश्वरी यांनी पहिले पुष्प गुंफले. या चार दिवसीय विचार महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, आमदार नीळकंठ हर्ळणकर व इतरांची उपस्थिती होती.
सिडनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या अधुर्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे युवा वर्गाला वेटलिफ्टिंगमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी सुरू केली आहे. क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. कष्ट करणार्यांना फळ सुध्दा चांगले मिळते, असेही मल्लेश्वरी यांनी सांगितले.
१२ व्या वर्षापासून प्रशिक्षण सुरू
वयाच्या १२ व्या वर्षीपासून वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गावात एक वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देणारा जीम होता. त्या ठिकाणी वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथील चार – पाच मुलांनी माझी खिल्ली उडवून हाकलून लावले. वेटलिफ्टर बनण्यापेक्षा घरी आईला घरकामासाठी मदत करण्याची त्यांनी सूचना केली. आपण या प्रसंगामुळे निराश, हताश झाले होते. परंतु, आईच्या प्रोत्साहनामुळे वेटलिफ्टर बनण्याचे आव्हान स्वीकारून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दर दिवशी साधारण १० ते १२ तास प्रशिक्षण घेत होते. सुरुवातीला वडिलांकडून थोडे कमी प्रमाणात प्रोत्साहन मिळत होते. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टिंग स्पर्धांत घवघवीत यश मिळू लागल्याने कष्टाचे फळ मिळू लागले.
पुढील वर्षापासून महोत्सव
सात दिवस ः मुख्यमंत्री
कोसंबी विचार महोत्सव पुढील वर्षीपासून सात दिवस आयोजित करण्यावर विचार केला जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कोसंबी यांचे मौलिक कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. विचार महोत्सवातून वैचारिक आदानप्रदान करून वैचारिक पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये वैचारिक क्षमता असते. या वैचारिक क्षमतेचे सामर्थ्य, ताकद आणखीन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. समाजात सकारात्मक विचारधारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मंत्री गोविंद गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.