
>> एफसी पुणे सिटीचा ४-० असा पराभव
एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमातील आव्हान कायम राखताना एफसी पुणे सिटीचा रविवारी ४-० असा धुव्वा उडविला. दोन पेनल्टी सत्कारणी लावतानाच आणखी दोन गोल करीत गोव्याने बहुमोल विजय नोंदविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर हुकमी स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास (५८वे मिनिट व ६५वे मिनिट पेनल्टी) याने दोन गोल केले. यात एका पेनल्टीचा समावेश होता, तर मॅन्युएल लँझारोटने (२८वे मिनिट) पेनल्टीवर गोल करीत खाते उघडले. ह्युगो बौमौसने (४७वे मिनिट) एका गोलची भर घातली.
गोव्याने मोसमात प्रथमच प्रतिस्पर्ध्याला एकही गोल होऊ न देता ‘क्लीन शीट’ राखण्याचा पराक्रमही केला. यामुळे त्यांच्या बचावातील त्रुटी दूर झाल्याचे सुद्धा दिसून आले. पुण्याच्या मार्सेलिनियोला दोन पिवळ्या कार्डमुळे मैदान सोडावे लागले. पूर्वार्धात तब्बल पाच जणांना कार्ड द्यागली. यात गोव्याच्या प्रणोय हल्दर, अहमद जाहौह व ह्युग बौमौस या तिघांचा, तर पुण्याच्या दिएगो कार्लोस आणि मार्सेलिनीयो या दोघांचा समावेश होता.
गोव्याने १६ सामन्यांत सातवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सहा पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. गोव्याचे २४ गुण झाले. मुंबई सिटी एफसीला (१६ सामन्यांतून २३) मागे टाकत गोव्याने एक क्रमांक प्रगती करीत सहावा क्रमांक गाठला. केरळा ब्लास्टर्स (१७ सामन्यांतून २५) पाचव्या स्थानावर आहे. पुण्याला १७ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला असून नऊ विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे २९ गुण आहेत. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले.