>> वरिष्ठ महिलांची टी-ट्वेंटी स्पर्धा
राजकोट येथे काल रविवारी झालेल्या वरिष्ठ महिलांच्या टी-ट्वेंटी लढतीत गोवा संघाने दिल्लीवर विजय मिळविण्याची सुवर्णसंधी गमावली. १२७ धावांचे माफक लक्ष्य असताना १ बाद ७१ वरून गोव्याचा डाव ९५ धावांवर नाट्यमयरित्या कोलमडला. त्यामुळे गोवा संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १२६ धावा केल्या. दिल्लीकडून एमएस उमेश हिने ५० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६१ धावा केल्या. आयुषी सोनी हिने ३० धावां केल्या. गोवा संघाकडून रुपाली चव्हाणने २६ धावांत २ तर सुनंदा येत्रेकरने २३ धावांत २ बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना १ बाद ७१ अशी भक्कम स्थितीतून गोव्याचा संघ शतकी वेसदेखील ओलांडू शकला नाही,. गोवाकडून सलामीवीर श्रेया परबने यंदाच्या मोसमातील आपला शानदार फॉर्म कायम राखत सर्वाधिक ५८ धावा केल्या. ११ खणखणीत चौकारांनी तिने आपली अर्धशतकी खेळी सजवली. दिल्ली संघाकडून ललिता शर्माने सर्वाधिक ४ गडी बाद केले.