गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर गोव्यातील दहा पोलिसांची पथके उत्तर प्रदेश येथील निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी काल रवाना झाल्याची माहिती मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपअधीक्षक मोंसेरात यांनी दिली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार गोव्यातून १० पथकांमधून ९०० पोलीस उत्तर प्रदेश येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत. या १० पथकांचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार हे पोलीस कंपनीचे नेतृत्व करणार आहेत. या पथकांमध्ये १० पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. राज्यात १४ रोजी विधानसभेसाठी मतदान शांततेत पार पडले. यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यात काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
दरम्यान, आता येथील सुमारे ९०० पोलीस उत्तर प्रदेश येथे होणार्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील राज्यातून आलेले पोलीस आपल्या राज्यात परतले आहेत. तसेच राज्यातील ९०० पोलीस उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच कमी मनुष्यबळामुळे कर्मचार्यांना अधिक वेळ सेवा बजावावी लागणार असल्याने पोलीस कर्मचार्यांवरील ताण वाढणार आहे.