गोव्यातील केवळ 20 टक्के सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक कामकाजासाठी संगणक सुविधा आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस 2023-24 च्या अहवालात नमूद केले आहे.
गोव्यातील 789 सरकारी शाळांपैकी केवळ 158 म्हणजे 20 टक्के शाळांमध्ये शैक्षणिक कामकाजासाठी कार्यरत संगणक सुविधा आहे. गोव्यातील एकूण 1487 शाळांपैकी 816 म्हणजे 54.9 टक्के शाळांमध्ये अशा सुविधा आहेत. त्यात 20 टक्के सरकारी शाळा, 94.6 टक्के सरकारी अनुदानित शाळा आणि 92.9 टक्के खाजगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. गोव्यातील 671 शाळांमध्ये अशी कोणतीही संगणक सुविधा नाही, असे अहवालात
म्हटले आहे.
गोव्यातील 1,487 शाळांपैकी केवळ 9 टक्के म्हणजेच 131 शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (सीडब्लूएसएन) अनुकूल शौचालये आहेत. 63 टक्के शाळांमध्ये रॅम्प आहेत आणि 57 टक्के शाळांमध्ये रॅम्प आणि हँड रेल आहेत. राज्यातील शाळांमध्ये 4,341 विशेष गरजा असलेली मुले नोंदणीकृत आहेत. त्यात 2,791 मुले आणि 1,550 मुली आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.