गोव्यातील विद्यार्थी चळवळ ः का पेटली आणि का शमली?

0
9
  • दिलीप बोरकर

आज विद्यापीठातील निवडणूक वगळता गोव्यात विद्यार्थिशक्तीचा मागमूसही दिसत नाही. याचा अर्थ गोव्यात आज लढण्यासारखे कसलेच प्रश्न अस्तित्वात राहिलेले नाहीत असा ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी अवश्य घ्यावा. मी फक्त म्हणेन, गोव्यातील ज्वलंत पलिते कधीच विझून गेले आणि तग धरून राहिलेत ते फक्त सत्तेचे मिंदे मतदार. म्हणूनच पुढच्या काळात विद्यार्थी चळवळ अशीच वळवळत राहणार आहे…

हल्लीच गोव्यातील काही माजी विद्यार्थी नेत्यांनी हयात असलेल्या एकेकाळच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना गोळा करून, गोव्यातील मागच्या काळातील विद्यार्थी चळवळीतल्या आठवणी जागवल्या. सदर चळवळीचे दस्तऐवजीकरण करण्याचा बहुतेक त्यामागचा उद्देश असावा…! तसं झालं तर गोव्यात एकेकाळी विद्यार्थिजगत सामाजिक भान बाळगून आपली समाजाप्रतीची बांधीलकी जपत असल्याची नोंद इतिहासात होईल. त्याचबरोबर विद्यार्थी चळवळीसारख्या फुटकळ आणि तात्पुरत्या घटना इतिहासाने नोंद करून घेण्याइतपत महत्त्वाच्या आहेत का, असाही एक प्रश्न काही फुटकळांच्या मनात रुंजी घालण्याची शक्यता आहे.
मुळात प्रश्न आहे तो समाजात विद्यार्थी चळवळीची गरज होती आणि आहे का…? विद्यार्थी म्हणजे विद्यार्जन करणारा! पालक आपल्या मुलांना ‘लया’त अथवा ‘पीठा’त पाठवतात ते विद्येचे अर्जन करण्यासाठी. आपल्या पाल्यांनी चांगल्यापैकी विद्या संपादन करावी आणि बऱ्यापैकी नोकरी पदरात पाडून घ्यावी आणि ती जर सरकारी असेल तर दुधात साखर अशी प्रत्येक पालकाची मानसिकता असते. एखादी चळवळ अथवा आंदोलन म्हटल्यावर ते प्रस्थापित अथवा सरकारच्या विरोधातच असते. त्यात सहभागी झाल्यास अथवा दुरूनही संबंध असल्याचे दिसून आल्यास त्यांचा समावेश काळ्या यादीत होणे ठरलेलेच असते. कारण त्यांना नोकरीवर घेणे म्हणजे विकतचे श्राद्ध असाच अर्थ लावला जातो.

दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी जीवनातील काळ हा प्रत्येकाने आपले भविष्य घडविण्याचा काळ असे अधोरेखित केलेले असते. या स्पर्धात्मक काळात इतरांपेक्षा आपलं नाणं कशाप्रकारे खणखणीत ठरेल याच विवंचनेत प्रत्येक विद्यार्थी असल्याने शिक्षण सोडून इतर व्यापांत म्हणा अथवा समाजाच्या दृष्टीने भानगडीत पडण्याकडे त्यांचा कल नसतो. त्यात विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण घेऊन आपलं भविष्य साकारावं, राजकारण अथवा तत्सम क्षेत्रात लुडबूड करू नये अशी समाज आणि पालकांची धारणा असल्याने विद्यार्थी डोळ्यांवर झापड चढवून पुस्तकांची ओझी वाहणे पसंत करतात. त्यामागची कारणे म्हणजे आपल्या भविष्याची चिंता, पालकांचा वचक आणि समाजाची निष्क्रिय आणि कातडीबचावू विचारसरणी म्हणायला हरकत नाही.

असं असलं तरी काहीवेळा काळाची गरज म्हणून याच विद्यार्थ्यांमधील अन्यायाविरुद्धची स्फुलिंगं धुमसत राहतात आणि कधी ती पेट घेऊन त्यांचा वणवा झाला याची त्यांनाच कल्पना येत नसते. जगात विद्यार्थी चळवळीस कसा आणि कधी प्रारंभ झाला आणि त्यामागची कारणं तशी स्पष्ट नाहीत. कारण विद्यार्थी जरी विद्यार्जन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित असला तरी सतत पालक आणि गुरुजन यांचा धाक, वचक आणि दबावामुळे स्वतःला स्वतंत्रपणे अभिव्यक्त करू शकत नाहीत. गुरू आणि पालक यांच्या ‘अतिशहाणपणा करू नकोस’ या एकाच वाक्यामुळे विद्यार्थी आपली वैचारिक कक्षा वाढवत स्वतंत्र निर्णय घेण्याच्या प्रयत्नात कधी शिरले नाहीत. तरीसुद्धा एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात क्रांतीची ठिणगी जरी उसळली तरी काळसुद्धा आपली गती आणि दिशा बदलू शकतो याची उदाहरणेही आमच्या इतिहासात नोंद झालेली आहेत. कारण विद्यार्थी हा सळसळत्या रक्ताचा युवक प्रथम आणि नंतरच विद्यार्थी असतो, हे आम्ही विसरता कामा नये. पेटून उठणे हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण हे मान्य करावेच लागेल.

विद्यार्थी चळवळीचा हा इतिहास तसा विद्यापीठाइतकाच जुना आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीत पाटलीपुत्रातही हा असंतोष धुमसत होता म्हणूनच आर्य चाणाक्य आपल्या कल्पनेतील राष्ट्र निर्माण करू शकले. 13 व्या शतकात पॅरिससारख्या शहरातही विद्यार्थी पेटून उठल्याची नोंद आहे आणि ते लोण नंतरच्या काळात इतरत्रही पसरत राहिले. पण खऱ्या अर्थाने जगात संघटित विद्यार्थी चळवळीचा प्रारंभ झाला तो 1960 आणि 1970 च्या दशकात असं म्हणावं लागेल. त्यामागची उद्दिष्टं सर्वसामान्यपणे विद्यमान सामाजिक नियमांना आव्हान देणे, नागरी हक्कांची होणारी पायमल्ली झाल्याने त्याचा निषेध करणे, युद्धविरोधी विचारांनी प्रेरित होऊन निदर्शने करणे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, जागतिक न्याय यांसारख्या प्रश्नावर विद्यार्थी स्वतः विचार करू लागले अथवा एखाद्या विचारवंताच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी संघटितपणे निषेध करण्याचे महत्त्व जाणले असावे.

आमच्या भारतात ‘विद्यार्थी चळवळ’ असा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा स्वातंत्र्यचळवळीच्या लढ्यापासूनच विद्यार्थी चळवळ सुरू असल्याचे लक्षात येईल. भगतसिंग म्हणा किंवा चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यचळवळीत सामील झाले होते. त्यांनी नौजवान भारत सभा स्थापन केली होती.
विद्यार्थी चळवळीचा जेव्हा विषय येतो तेव्हा देशातील ‘जेएनयू’ म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण सततच्या चळवळीमुळे हे विद्यापीठ आदर्श शिक्षणाबरोबरच विद्यार्थी चळवळीसाठीही नेहमीच चर्चेत असते. जेव्हा जेएनयूचा संदर्भ आलेलाच आहे तेव्हा विद्यापीठांचं नेमकं कार्य काय असतं याविषयी जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं लक्षात घेणं समर्पक ठरेल. ते सांगतात- ‘मानवतावाद, सहिष्णुता, विवेक, कल्पनांचे साहस आणि सत्याचा शोध घेणे व मानवी उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाणे हे विद्यापीठाचे काम आहे.’

पण आज आमच्या देशातील विद्यापीठं ही उद्दिष्टं पूर्ण करताना कुठेच दिसत नाहीत. आज आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असतो, ‘भारत हा आज तरुणांचा देश आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ते सत्य आहे. कारण आज मतदानात तरुणांची टक्केवारी जास्त आहे. याच तरुणांनी आज देशात विशिष्ट विचारसरणीचा उदोउदो करणाऱ्या राजकीय पक्षास सत्तेवर नेऊन आरुढ केलेलं आहे. पण सत्ता हातात आल्याबरोबर याच तरुणांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा सातत्याने प्रयत्न राबवला जातो, ज्यात विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थांचा असंतोष पेट घेतल्याशिवाय राहत नाही. विद्यापीठांच्या संदर्भात नेहरूंच्या याच विचारावर बोट ठेवून देशात विद्यार्थिशक्ती जागृत झाली. त्यांना आपल्या ताकदीची जाणीव झाली. अखिल आसाम विद्यार्थी संघटनेने तर सरकार स्थापन करण्यापर्यंत मजल मारून संघटित विद्यार्थिशक्तीची ताकत सिद्ध करून दाखविली.

गोव्याच्या बाबतीत विद्यार्थी चळवळीचा विचार करायला गेल्यास तो फक्त तीन टप्प्यांतच करावा लागेल. गोवा मुक्तिसंग्रामाच्या काळातील विद्यार्थी गोव्याच्या पारतंत्र्याविषयी जागृत होते. पण विद्यार्थी संघटना स्थापन करून संघटितपणे उठाव करण्याचा विचार केल्याचे दिसत नाही. त्यांनी व्यक्तिगत स्वरुपातच स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान देणे पसंत केले. संघटितपणे गोव्यात खऱ्या अर्थाने विद्यार्थी चळवळ आरंभ झाली अथवा विद्यार्थ्यांमध्ये संघटित होण्याची जाणीव होऊ लागली ती 1970 च्या दशकात. त्या काळात तत्कालीन विद्यार्थी दत्ता दामोदर नायक, गिरिश काशिनाथ सरदेसाई, नॉयेल डिसौझा, राजू वालावलीकर वगैरे विद्यार्थ्यांना संघटित करण्यात सक्रिय होते. त्यांनी अखिल गोवा विद्यार्थी संघटना स्थापन करून विद्यार्थी वर्गाचे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला होता. पण ही संघटना सामंजस्याने प्रश्न सोडवण्याच्या मताची असल्याचे दिसून येते. कारण त्याकाळी एखादे उग्र आंदोलन झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामागची कारणंही लक्षात घेण्याची गरज आहे.
विद्यार्थी संघटना अथवा चळवळ म्हटल्यावर सरकाराशी अथवा प्रस्थापित आस्थापनाशी संघर्ष हा ठरलेलाच असतो. विद्यार्थ्यांनी राजकारणात शिरू नये अथवा राजकारण करू नये असे तर प्रस्थापितांचे सांगणे अथवा मत असले तरी राजकारण आणि विद्यार्थी यांना वेगळे करणे शक्य नाही. कारण विद्यार्थ्यांच्या हिताचे अथवा अहिताचे निर्णय सरकार अथवा शैक्षणिक आस्थापने घेत असतात. त्यांचे निर्णय स्वतःचा फायदा लक्षात घेऊन, चौकटीत बंधिस्त केलेले असतात. तेव्हा ते सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचेच असतील असे काही नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या हितरक्षणासाठी सदर सरकारी निर्णयांचा अस्वीकार संघटितपणे मांडण्याची आवश्यकता असायची. तत्कालीन सरकार आणि व्यवस्थापन सहिष्णु असल्याने अथवा विद्यार्थी संघटना मवाळ असल्याने सगळे काही सामंजस्याने घडायचे. भ्रष्टाचारास अजून आरंभ झाला नव्हता आणि विद्यार्थी वर्गाबाबतीत प्रस्थापितांत आपलेपणा होता हीसुद्धा यामागची कारणे असू शकतात.

वर सांगितलेला विद्यार्थी चळवळीचा गोव्यातील पहिला टप्पा होता. तत्कालीन विद्यार्थी चळवळी अथवा संघटना नाही म्हटल्यास राजकारणात शिरण्याच्या पायऱ्या होत्या. विद्यार्थी संघटनेचे बहुतेक संस्थापक पुढारी नंतरच्या काळात युवा काँग्रेसमध्ये सहभागी होऊन इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या भोवताली फिरू लागले. त्यामुळे ही विद्यार्थी संघटना नावापुरती राहिली अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे हा पहिला टप्पा काळाच्या उदरात गडप झाला.

विद्यार्थी चळवळीचा दुसरा टप्पा आरंभ झाला तो 1974-1975 च्या काळात. या काळात महाविद्यालयातील वेगवेगळ्या शाखांमध्ये काही विशेष गुण असलेले नव्या दमाचे विद्यार्थी भरती झाले. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक अथवा साहित्यिकांची असल्याने हे विद्यार्थी सामाजिक बांधीलकी आणि कला, साहित्य यांचा वसा घेऊनच महाविद्यालयात प्रवेश करते झाले होते. त्यात भर म्हणून या विद्यार्थ्यांच्या संपर्कात मुंबईच्या महाविद्यालयांतील विद्यार्थी नेते असायचे. त्या काळात गोव्याचे स्वतंत्र विद्यापीठ नसल्याने, गोव्यातील सर्वच्या सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठास संलग्नित होती. मुंबईत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संघटना कार्यरत होत्या आणि त्या निरनिराळ्या राजकीय पक्षांशी लागेबांधे बाळगून होत्या. मुंबईतील या संघटनांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मंडळं स्थापन करण्याची चुरस असल्याकारणाने गोव्यातील महाविद्यालयांतून निवडून आलेले एक-दोन विद्यापीठ प्रतिनिधी म्हणजे मुंबईच्या विद्यार्थी संघटनांना महत्त्वाचा टेकू असायचा. त्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे नेते गोव्यातील विद्यार्थी नेत्यांच्या संपर्कात राहून या विद्यापीठ प्रतिनिधीसाठी गळ लावून गोव्यात बस्तान ठोकायचे.
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयांतून निवडून आलेल्या विद्यापीठ प्रतिनिधींचे मूल्य त्याकाळी आज सरकार घडविण्यासाठी आमदारांचे जे आहे, त्याच प्रकारचे असायचे. आपल्या संघटनेचे विद्यार्थी मंडळ घडावे म्हणून सत्ताधारी पक्षापासून सगळेच राजकीय पक्ष साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करायचे. एखादा विद्यापीठ प्रतिनिधी आपल्या गळाला लागत नाही आणि त्याच्या पाठिंब्यावर दुसरी संघटना मंडळ स्थापन करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर प्रथम साम, नंतर दाम वापरून तो पाठिंबा मिळवला जायचा. जर ते शक्य झालं नाही तर त्याला रातोरात पळवायचे आणि लपवून ठेवायचे. या प्रकारची कल्पना आजचे राजकारण पाहून लक्षात येईल. त्यामुळे आपल्या ‘युआर’ना (विद्यापीठ प्रकिनिधी) जिवापाड जपले जायचे.
गोव्यातील साध्याभोळ्या विद्यार्थी नेत्यांना भ्रष्टाचाराची चटक लावली ती मुंबईच्या या विद्यार्थी नेत्यांनी. ‘युआर’ना पैसे चारून विकत घेण्याचा प्रकार त्याकाळी घडायचा तो गोव्याचे स्वतंत्र विद्यापीठ होईपर्यंत चालू होता.

अशी ही प्रक्रिया गोव्यात चालू असताना त्याचे उपफळ म्हणून 1975-1976 च्या काळात अखिल गोवा विद्यार्थी संघटना (ऑल गोवा स्टुडंट यनियन) स्थापन झाली. त्यापूर्वी अगोदर मुंबईच्या विद्यार्थी नेत्यांच्या संपर्कात आलेल्या पणजी लायसियमवर स्थित असलेल्या वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली होती. परंतु त्या महाविद्यालयातील गुंडागर्दीमुळे ही संघटना त्या महाविद्यालयापुरती मर्यादित होती. जेव्हा अ.गो.वि.स.ची स्थापना झाली तेव्हा ती संपूर्ण गोवाभर विस्तारली. त्याचे कारण म्हणजे, ज्यांच्या हातात संघटनेचे नेतृत्व होते, त्या विद्यार्थी नेत्यांची विश्वसनीयता आणि राबवलेले कार्यक्रम विद्यार्थ्यांना आकर्षून घेत होते. सदर संघटनेने विद्यापीठ फी वाढ, विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के बसप्रवास सवलत, वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षण, कॅपिटेशन फी अशी कितीतरी प्रकरणे हातात घेऊन धसास लावली होती आणि त्यात यश संपादन केले होते.
नंतरच्या काळात नेतृत्वाच्या आणि इतर लहान-सहान प्रकरणांमुळे वाद निर्माण होऊन एकसंध असलेल्या विद्यार्थी चळवळीत फूट पडली. ‘ऑल गोवा स्टुडंट यनियन’ची दोन शकले पडून प्रोग्रेसिव्ह स्टुडंट युनियन ही नवी संघटना स्थापन झाली. ही संघटना आपले कार्यक्रम राबवू लागली. स्पर्धात्मक काळ आरंभ झाला. हेवेदावे वाढले आणि विद्यार्थी चळवळीस उतरती कळा लागली.

या दोन्ही संघटनांनी आपल्या कारकिर्दीत कुठल्याच राजकीय पक्षाचे मांडलीक न बनता गोव्यात विद्यार्थी संघटना उभारून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्या. सरकारसमोर एक प्रचंड आव्हान या विद्यार्थी संघटनांनी उभं केलं. कित्येक प्रश्न सदर संघटना हाताळायच्या. शैक्षणिक वर्ष आरंभ झाले रे झाले की या संघटना पहिले दोन महिने नव्या आंदोलनासाठी प्रकरणं शोधायची. त्यामुळे सरकार वचकून असायचे. कसलंही धोरण ठरवताना आणि निर्णय घेताना विद्यार्थ्याच्या मताचा विचार केला जायचा. आंदोलन उभारण्यासाठी टपून बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात जाणूनबुजून पेटता पलिता देण्याची सरकारची तयारी नव्हती. सरकार विद्यार्थी शक्तीस वचकून असायचे. विद्यार्थी संघटना म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारी एक प्रचंड ऊर्जा, असा ठसा विद्यार्थ्यांनी सरकार दरबारी उमटविला होता.
असा हा विद्यार्थी चळवळीचा दुसरा टप्पा होता, ज्याने सरकारच्या नाकी नऊ आणत कितीतरी प्रकरणांत विजय मिळवला होता. विद्यार्थ्याने कुठलेही प्रकरण हाती घेतले तरी त्यात विजय हा नक्की असे समीकरणच होऊन गेले होते.

पण मांडवीतून नंतरच्या काळात बरंच पाणी वाहून गेलं. दुसऱ्या टप्प्यातल्या संघटनांच्या नेत्यांनी निरनिराळी यशं पदरात पाडून घेतली, परंतु आपल्या कारकिर्दीत नवे नेतृत्व निर्माण करण्यात मात्र त्यांना अपयश आले. त्यामुळे हळूहळू एकेकाळी उत्तुंग शिखरावर तळपणाऱ्या या संघटना आपले अस्तित्व हरवून बसल्या.
सापाच्या मृत्यूने म्हणे उंदरांना चेव येतो. विद्यार्थी चळवळी नेस्तनाबूत झाल्यावर राजकारणी मातले आणि चेकाळले. भ्रष्टाचार हाच एककलमी कार्यक्रम लोकनियुक्त प्रतिनिधींनी स्वीकारला. भ्रष्टाचारास संघटित विरोध करू शकणारी एकसंध संघटना फक्त विद्यार्थ्यांचीच होती. इतर संघटना अस्तित्वात होत्या त्या आपापल्या मर्यादेतल्या. कामगार संघटना कामगारांचे प्रश्न घेऊन होत्या, तसेच इतरांना आपल्यापुरते पडून गेलेले.

अशा या वातावरणात लढाऊ विद्यार्थी संघटना लोप पावून पक्षीय राजकारण खेळणाऱ्या संघटना मातल्या. आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी विद्यार्थी संघटनांना राबविण्याचा काळ आरंभ झाला. हा विद्यार्थी चळवळीचा तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा म्हणायला हरकत नाही.

शेवटचा टप्पा असं मी सारासार विचार करून लिहितो. ज्या काळात मी विद्यार्थी चळवळीत होतो त्याकाळी विद्यार्थी नेत्यांत असलेली सामाजिक बांधीलकी, निष्ठा आणि वैचारिक प्रगल्भता आजच्या विद्यार्थी नेत्यांत दिसून येत नाही. आज ज्या काही विद्यार्थी संघटना अस्तित्वात आहेत अथवा अस्तित्व टिकविण्यासाठी चाचपडत आहेत, त्या राजकीय प्रभावाने प्रेरित झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या संघटना काळाच्या ओघात संपलेल्या आहेत आणि आपला पक्ष सत्तेवर आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर कसा करावा याचाच विचार संघटनेचे नेतृत्व करते. आजचा विद्यार्थी राजकीय पक्षासाठी एक मतदार एवढेच त्याचे मूल्य आहे.
आजचा काळ हा दचकून वावरणाऱ्यांचा काळ आहे. सत्ता राबवणारे पक्ष जनतेला मिंदे बनवून फक्त मतांसाठी रावबवत आहेत. वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवून त्या मिळविण्यासाठी मिंदे बना, नोकरी पाहिजे असेल तर मुकाट्याने बिनबोभाट शिक्षणाचे दाखले पदरी घ्या आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते बना. नोकरीचे आमिष त्यांच्यासमोर नाचवून आणि प्रसंगी भीती घालून सगळ्यांनाच लाचार करून टाकलेले आहे. असल्या या वातावरणात स्वतंत्र विचार करणारी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी विद्यार्थी शक्ती निर्माणच होणे नाही. तसे जर नसते तर मागच्या एका दशकात विद्यार्थ्यांचा निदान एक तरी मोर्चा रस्त्यावर आलेला दिसला असता. पण विद्यापीठातील निवडणूक वगळता गोव्यात विद्यार्थिशक्तीचा मागमूसही दिसत नाही. याचा अर्थ गोव्यात आज लढण्यासारखे कसलेच प्रश्न अस्तित्वात राहिलेले नाहीत असा ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी अवश्य घ्यावा. मी फक्त म्हणेन, गोव्यातील ज्वलंत पलिते कधीच विझून गेले आणि तग धरून राहिलेत ते फक्त सत्तेचे मिंदे मतदार. म्हणूनच पुढच्या काळात विद्यार्थी चळवळ तिसऱ्याच टप्प्यावर अशी वळवळत राहणार आहे…