पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील आर्थिक व्यवहार सुरू ठेवून लॉकडाऊन आणखी वाढविण्याची विनंती केली जाणार आहे. राज्याच्या सीमा, विमानसेवा, रेल्वे, आंतरराज्य रस्ता वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींना राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीचे निवेदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे सचिवालयात काल दिली.
पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधण्याची संधी मिळाली नाही. केवळ ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली.
पंतप्रधान मोदी यांना राज्य सरकारच्यावतीने निवेदन पाठवून राज्यातील आर्थिक व्यवहार सुरू ठेवून लॉकडाऊन वाढविण्याची विनंती केली जाणार आहे. शेजारी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने सीमा बंद ठेवण्याची विनंती केली जाणार आहे. विमान, रेल्वे, आंतरराज्य रस्ता वाहतूक बंद ठेवण्याची शिफारस केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोमेकॉत कोरोनाचे
६ संशयित दाखल
बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ६ जणांना काल दाखल करण्यात आले आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ११३ नमुन्यांच्या चाचण्या नकारात्मक आहेत.
आरोग्य खात्याने तीन जणांना क्वारंटाईऩ केले असून क्वारंटाईन केलेल्याची संख्या ३१९ झाली आहे. खास विभागाकडून १४७ नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतील १४८ नमुन्यापैकी ११३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तर, ३५ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या तिघांनी सात दिवस सरकारी क्वारंटाईऩ आणि ७ दिवसांची होम क्वारंटाईन पूर्ण केली आहे. तर चार जणांनी सरकारी क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर त्यांना सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.