गोव्यातील दोन युवकांची सावंतवाडीत आत्महत्या

0
116

विदेशी चलन व्यवहार करणार्‍या एका कंपनीतील अफरातफरीप्रकरणी आपल्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल झाल्याने गोव्यातील दोघा युवकांनी सावंतवाडीतील ‘रामकृष्ण लॉज’ नामक हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. नीलेश पार्सेकर (कामुर्ली, वय ४०) आणि प्रदोष शंकर चोडणकर (बेती, वय ३८) अशी या युवकांची नावे असून त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे काल आढळून आले.नीलेश आणि प्रदोष हे दोघेही कळंगुट येथील एका विदेशी चलन व्यवहार करणार्‍या कंपनीत कामाला होते. सदर कंपनीने त्यांच्याविरुद्ध सुमारे ८२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली होती. त्याची कुणकुण लागताच निलेश आणि प्रदोष त्या दिवसापासून फरार झाले होते. पर्वरी पोलिस स्थानकात दि. ४ रोजी बेती येथील प्रदोष चोडणकर बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी पूर्वी चोडणकर हिने दाखल केली होती. दि. ३ रोजी पती प्रदोष सकाळी ९ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. परंतु तो न परतल्याने त्याची वाट पाहून पूर्वीने दि. ४ रोजी पर्वरी पोलिस स्थानकात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, प्रदोष याचा शोध घेत असता त्याची दुचाकी मिरामार सर्कलजवळ उभी केलेली आढळून आली. पोलिसांकडून त्यामुळे त्याच्या पत्नीला कळविण्यात आले. तेथे जाऊन पत्नीने दुचाकीची पाहणी केली असता त्या दुचाकीत प्रदोषने लिहिलेली आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी सापडली. बेतीचे हवालदार सुरेश देसाई यांनी चिट्ठी ताब्यात घेऊन पंचनामा केला. दरम्यान, नीलेश व प्रदोष हे सावंतवाडी येथील रामकृष्ण लॉजमध्ये उतरले. मात्र, काल सकाळी नऊ वाजले तरी त्यांनी दार न उघडल्याने मालकाने दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता दोघेही आत मृतावस्थेत आढळले. लॉजचे मालक मसूरकर यांनी या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना देताच त्यांनी पंचनामा केला.