काळा पैसा देश कमकुवत बनवतोय : डॉ. स्वामी

0
97

काळा पैसा आपल्याला कमकुवत बनवत आहे. इतर विकसित देशांशी स्पर्धा करण्याऐवजी मागे खेचत आहे. मोठ्या प्रमाणात जी लाचलुचपत दिली जाते, त्याचे विपरित परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर होत आहेत. १२० लाख कोटी रुपये काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये आहे. सत्तर देशांमध्ये ही रक्कम विखुरलेली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे काळ्या पैसेवाल्यांची नावे आहेत व ही गोष्ट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी येथे केले.द फोरम फॉर इंटग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी तथा ‘फिन्स’च्या गोवा शाखेतर्फे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या व्याख्यानमालेचे आयोजन पणजीत करण्यात आले आहे. त्यावेळी पहिले पुष्प गुंफताना डॉ. स्वामी बोलत होते. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामध्ये उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर, राष्ट्रीय अध्यक्ष मेजर जनरल शेकटकर, गोवा शाखेचे सरचिटणीस महेश म्हांबरे उपस्थित होते. डॉ. स्वामी म्हणाले, काळा पैसा दोन प्रकारचा असतो. एक साठवलेला (स्टॉक मनी) व दुसरा प्रवाही (मनी इन फ्लो) प्रवाही किंवा फिरता काळा पैसा देशातच आहे, तर साठवलेला काळा पैसा विदेशात. साठवलेला पैसा बेहिशेबी असतो, तर फिरता पैसा कुठून आला व कुठे जाणार याचा पत्ता नसतो. असा साठवलेला पैसा माकांव, स्वित्झर्लंडसह सत्तर देशांमध्ये साठवला गेला आहे आणि कष्टकरी लोक मात्र मोठ्या प्रमाणावर आयकर भरत आहेत. काळ्या पैशाची लागण सर्व राजकीय पक्षांना झाली आहे. काळ्या पैशात पुन्हा लाल पैसा (रेड मनी) आहे जो मोठे घोटाळे, आतंकवाद, ड्रग्स यात गुंतलेला आहे असे डॉ. स्वामी यांनी स्पष्ट केले.
स्वित्झर्लंड अशा पैशांवरच्या ठेवीवर दोन टक्के व्याज देते व तो पैसा अमेरिकेत ठेवून चार टक्के व्याज उपटते. काळ्या पैशाच्या यादीतील नावे सर्वोच्च न्यायालय जाहीर करील. हा काळा पैसा भारतात येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केलेल्या एका श्रोत्याला उत्तर देताना डॉ. स्वामी यांनी सांगितले की हा पैसा आणला जाईलच, कारण ते मोदी सरकारचे ‘मिशन’ आहे.
नागरिकांचे मूलभूत हक्क राष्ट्राने त्यागून चालणार नाही याची जाणीव देऊन डॉ. स्वामी म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेतील सत्तर टक्के काळा पैसा हा आरामदायी वस्तूंवर खर्च केला जातो, ज्याच्याशी सर्वसामान्यांचे काही देणेघेणे नसते. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनीही यावेळी विचार मांडले.