गोव्याचे आव्हान आटोपले

0
111

कर्नाटकने मिझोरमचा १-० असा पराभव करत संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्यांचा सामना विद्यमान विजेत्या बंगालशी होणार आहे. कर्नाटकच्या विजयासह गोव्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कर्नाटकने कालच्या विजयासह मिझोरमला सरस गोल सरासरीच्या जोरावर मागे टाकत ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविले. उभय संघांनी गट फेरीत प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. ३० मार्च रोजी होणार्‍या उपांत्य फेरीत मिझोरमचा सामना ‘अ’ गटात अव्वल राहिलेल्या केरळशी मोहन बागान मैदानावर होणार आहे तर कर्नाटक व बंगाल यांच्यात हावडा मैदानावर दुसरा उपांत्य सामना होईल. कालच्या सामन्यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित केल्यामुळे मिझोरमने कर्नाटकविरुद्ध तब्बल नऊ बदल केले. पंजाबवर २-१असा विजय मिळविलेल्या संघातील केवळ बचावपटू बुआंगा व झोमुआना यांना काल मिझोरमने मैदानावर उतरवले.

उर्वरित नऊ खेळाडू नवखे होते. कर्नाटककडून सामन्यातील एकमेव गोल राजेश एस. याने ७४व्या मिनिटाला नोंदविला. कर्नाटकच्या विजयामुळे गोव्याला पंजाबविरुद्ध ४-१ अशा विजयानंतरही स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. रवींद्र सरोवर मैदानावर झालेल्या या सामन्यात गोव्याकडून मॅकरॉय पिक्सोतो (२५वे मिनिट) याने पहिला गोल केला. चारच मिनिटांनंतर व्हिक्टोरिनो फर्नांडिसने आघाडी दुप्पट केली. ५९व्या मिनिटाला नेस्टर डायसने तर ६७व्या मिनिटाला शुबर्ट परेराने गोव्याकडून गोल केला. पंजाबचा एकमेव गोल गुरतेज सिंग याने (९०+ ४) याने नोंदविला. सलामीच्या लढतीत मिझोरमकडून ३-१ असा व दुसर्‍या सामन्यात कर्नाटककडून ४-१ असा मोठा पराभव झाल्याने गोव्याला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले होते.