गोव्याची अनुरा उबेर संघात

0
55

थायलंडमधील बँकॉक येथे २० ते २७ मे या कालावधीत होणार्‍या बीडब्ल्यूएफ थॉमस व उबेर कप स्पर्धेत अनुक्रमे एच.एस. प्रणॉय व सायना नेहवाल भारतीय संघांचे नेतृत्व करणार आहेत. देशांतर्गत बॅडमिंटनमधील क्रनांक एकची खेळाडू असलेल्या गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईचा उबेर कपसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे हे २७वे वर्ष असून आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता प्रणॉय, जागतिक क्रमवारीत १८ल्या स्थानावरील बी. साई प्रणिथ, युवा समीर वर्मा व ज्युनियर नंबर ४ लक्ष्य सेन यांच्यावर पुरुष एकेरीत भारताची मदार असेल.
महिलांमध्ये अनुभवी सायनाव्यतिरिक्त वैष्णवी जक्का रेड्डी (वर्ल्ड नं. ६४, ज्युनियर नं. ५), साई कृष्ण प्रिया (वर्ल्ड नं. ६६), भारताची क्रमांक एकची खेळाडू अनुरा प्रभुदेसाई व वैष्णवी भाले या युवा खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेशा खेळ करावा लागणार आहे.

पुरुष दुहेरीत अनुभवी सुमिथ रेड्डी व मनू अत्री यांच्यासह जागतिक क्रमवारीत ४३व्या स्थानावर असलेली श्‍लोक रामचंद्रन व अर्जुन एमआर या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची दुहेरीतील अव्वल जोडी सन्यम शुक्ला व अरुण जॉर्ज यांच्याकडूनही काही सनसनाटी निकालांची अपेक्षा केली जात आहे. महिला दुहेरीत जे. मेघना, पूर्विशा राम, प्राजक्ता सावंत व संयोगिता खोरपडे आपला खेळ दाखवतील. थॉमस कपमध्ये भारत आपला सलामीचा सामना फ्रान्सविरुद्ध खेळेल. यानंतर ऑस्ट्रेलिया व चीनशी भारताचा सामना होईल. तर उबेर कपमध्ये कॅनडानंतर ऑस्ट्रेलिया व जपानशी भारताला दोन हात करावे लागतील.