>> एनसीबीची कारवाई; ब्राझिलियन महिलेसह गोव्यातून एक नायजेरियन अटकेत
मुंबई येथील नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई विमानतळावर गोव्याकडे येणार्या ब्राझीलची नागरिक असलेल्या एका महिलेकडून सुमारे १३ कोटी रुपयांचे ३.२० किलोग्रॅम उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. त्यानंतर या अमलीपदार्थ प्रकरणी गोव्यातील हॉटेलमधून एका नायजेरियन नागरिकालाही अटक केली. या कारवाईनंतरच एनसीबीने आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ व्यवहाराचा पर्दाफाश केल्याची माहिती काल दिली. या कारवाईतून देशात पहिल्यांदाच ब्लॅक कोकेनची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर तपासणीदरम्यान नवा मरिना (३५) नामक ब्राझिलियन नागरिक महिलेच्या सुटकेसमध्ये ब्लॅक कोकेन हा अमलीपदार्थ आढळून आला. तिच्या सामानात १२ पॅकेट घट्ट बांधलेली आढळली. पॅकेट तपासल्यावर काळ्या रंगाचा पदार्थ सापडला. ब्लॅक कोकेन हा कोकेनचाच एक प्रकार आहे, जो इतर पदार्थांमध्ये मिसळून त्याचा रंग काळा करतो. त्यामुळे त्याची तस्करी मेटल मोल्ड्स किंवा डांबर म्हणून केली जाते. हे अमलीपदार्थ स्निफर श्वानांना देखील ओळखता येत नाही. या संदर्भात तीन दिवस कारवाई सुरू होती.
ब्राझिलियन महिला ब्राझील ते गोवा असा प्रवास करत होती. सदर महिला मुंबईत उतरल्यानंतर तेथून गोव्याला उड्डाण करणार्या विमानात बसणार होती, त्याआधीच तिला ताब्यात घेण्यात आले. गोव्यात हा अमलीपदार्थ आणून तो नायजेरिन नागरिकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार होता. त्या आधीच एनसीबीने या व्यवहाराचा पर्दाफाश केला. सदर महिलेच्या चौकशीत या व्यवहारात गुंतलेल्या गोव्यातील एका नायजेरियन नागरिकाची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या गोवा शाखेला त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सदर नायजेरियन नागरिकालाही अटक केली.
मोरजीत ९ लाखांचे अमलीपदार्थ जप्त
गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने मोरजी येथे छापा घालून एका रशियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून ९ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. मेक्जिम माकारोव्ह (३८) असे अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकाचे नाव आहे. त्याच्याकडून ९०० ग्रॅम हशिश तेल जप्त करण्यात आले.
ब्लॅक कोकेन पकडणे कठीण
ब्लॅक कोकेन पकडणे कठीण असते. श्वान पथकसुद्धा ह्याचा गंध ओळखू शकत नाहीत. यामागे कारण आहे, ते म्हणजे सामान्य कोकेनचा गंध येतो; पण ब्लॅक कोकेनमध्ये गंधच येत नाही. त्यामुळे ब्लॅक कोकेन ओळखणे कठीण आहे, असे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांनी सांगितले.