>> फर्मागुडीतील उटाच्या सभेत अनुसूचित जमातींच्या नेत्यांचे समाजबांधवांना आवाहन
प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल एक सुद्धा आक्षेपार्ह शब्द उच्चारलेला नाही; पण 5 सेकंदाच्या त्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोव्यात अपप्रचार करण्यात आला. उटाच्या आणि समाजबांधवांच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित असून, अनुसूचित जमातीच्या लोकांनी गोविंद गावडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले.
फर्मागुडी येथील गोपाळ गणपती सभागृहात आयोजित केलेल्या उटाच्या सभेत अध्यक्ष ते बोलत होते. यावेळी डॉ. उदय गावकर, दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, दया गावकर, मोलू वेळीप व अन्य पदाधिकारी उपास्थित होते.
गेल्या काही वर्षापासून गोविंद गावडे यांनी अनेक मागण्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवठा केला आहे. काही मागण्यांविषयी गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात भाष्य केले होते, त्यात काही चुकीचे नाही. समाजबांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गोविंद गावडे यांनी सतत सहकार्य आणि मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे समाजबांधवांनी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन वेळीप यांनी केले.
2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री गोविंद गावडे यांच्यामुळेच प्रमोद सावंत हे पुन्हा मुख्यमंत्री बनले. आदिवासी कल्याण खात्याकडून लोकांना चांगली वागणूक मिळत नाही. गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. तसेच त्यांच्या भाषणाचा अनर्थ करण्यात एका राजकीय व्यक्तीचे षड्यंत्र आहे. समाजबांधवांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे विश्वास गावडे यांनी सांगितले.
अनुसूचित जमातीतील लोकांच्या काही मागण्या फक्त नावापुरत्या मान्य करण्यात आल्या आहेत. प्रेरणा दिन कार्यक्रमात गोविंद गावडे यांनी केलेल्या भाषणाचा अनर्थ करून त्यांना राजकीयकदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण त्यांना राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास समाजबांधवांना वेगळा विचार करण्याची गरज असल्याचे डॉ. उदय गावकर यांनी सांगितले. दुर्गादास गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल गावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गोविंद गावडेंवरील कारवाईचा निर्णय सोमवारपर्यंत लांबणीवर
मंत्री गोविंद गावडे यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय भाजपने सोमवारपर्यंत लांबणीवर टाकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे पुन्हा दिल्लीला गेल्याने कारवाईचा निर्णय लांबला आहे. मंत्री गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात केलेल्या भाषणात आदिवासी कल्याण खात्यावर केलेल्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मंत्री गोविंद गावडे यांच्यातील गुरुवारी बैठक होऊ शकली नव्हती. ते गुरुवारी संध्याकाळी गोव्यात परतले होते; मात्र गोव्यात परतल्यानंतर पुन्हा रात्री तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे शुकवारी होणारी संभाव्य बैठक देखील रद्द झाली. दामू नाईक हे आता रविवारी रात्री गोव्यात परतणार असून त्यानंतर सोमवारी मंत्री गोविंद गावडे यांची बाजू ऐकून घेणार आहेत. तत्पूर्वी, दामू नाईक हे दिल्लीत केंद्रीय नेत्यांशी मंत्री गावडे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा करणार आहेत.