गोवा, सिंधुदुर्गात तीन दिवसांत मुसळधार पाऊस

0
3

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

हवामान खात्याने गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्याने वारे तेलंगणा, कर्नाटकातून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर येत्या तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

देशातील हवामान गेल्या आठवडाभरापासून मोठा बदल होत आहे. पहाटे आणि रात्री थंडी, तर दिवस ऊन असे वातावरण असून येत्या 48 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचादेखील अंदाज व्यक्त केला आहे.
देशातून मान्सून पूर्णपणे परतला मात्र, अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. पुढील सात दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.