गोवा सरकारने जागा दिल्यास मुरगाव बंदराचा विस्तार ः गडकरी

0
109

>> गोव्याचा ना हरकत दाखला मिळताच पर्यटकांसाठी फेरीसेवा

केंद्र सरकारच्या जहाजोद्योग मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत गोव्यातील नद्यांतून पर्यटकांसाठी फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव केवळ गोवा सरकारच्या ‘ना हरकत दाखल्या’अभावी रखडला असल्याची माहिती केंद्रीय जहाजोद्योग, रस्ते तथा महामार्ग खात्याचे मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी काल पत्र सूचना कचेरीद्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या व्हिडिओ लिंक वार्तालाप कार्यक्रमात ‘नवप्रभा’ला दिली. आपण या विषयात गोवा सरकारशी अनेकवेळा पाठपुरावा केला. शनिवारी आपण बंदरांच्या अध्यक्षांच्या परिषदेसाठी गोव्यात येत असून त्यावेळीही गोवा सरकारकडून हा ‘ना हरकत दाखला’ लवकरात लवकर मिळावा यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य आहे. येथील नदी किनार्‍यांवरील हॉटेलांना जलमार्गांने मुरगाव बंदराशी जोडता आले, तर पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरेल. पर्यटकांना मुरगाव बंदरावरून थेट हॉटेलपर्यंत पोहोचवणारी फेरी सेवा आम्ही लवकरात लवकर सुरू करू इच्छितो आहोत, परंतु केवळ गोवा सरकारच्या ‘ना हरकत दाखल्या’अभावी ते काम रखडले आहे. ही परवानगी मिळताच पर्यटकांना अशा प्रकारची फेरी सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही श्री. गडकरी यांनी यावेळी दिली. अशा प्रकारच्या सेवेसाठी लागणारे संपूर्ण सहकार्य आपले मंत्रालय देईल असे ते पुढे म्हणाले.
‘सागरमाला’ अंतर्गत गोव्यातील सहा नद्यांमध्ये जलमार्गांद्वारे वाहतूक सुरू करता यावी यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम जहाजोद्योग मंत्रालयाने सुरू केलेले आहे. त्याच्याशी निगडित आर्थिक बाबींवरही आपण उद्या गोव्यात आल्यावर चर्चा करून आर्थिक नियोजन करू असे श्री. गडकरी यांनी सांगितले. यासंदर्भात सविस्तर अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्याचे काम पूर्ण होताच या प्रकल्पाला वेग येईल असे श्री. गडकरी म्हणाले. खासगी कंपन्याना या जलमार्गांतून व्यावसायिक वाहतूक करायची असेल तर आमचे मंत्रालय त्यांना मदत करण्यास तयार आहे, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
गोव्यात दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा आपण या वर्षारंभी केलेली होती. त्यानुसार जुवारीवरील पुलाचे कामही सुरू केलेले आहे. त्या पुलावर पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनेल अशा प्रकारचा फिरता निरीक्षण मनोरा उभारण्याचे आपले स्वप्न आहे. त्यावर जाण्यासाठी लिफ्टचीही सोय असेल. गोव्यात येणार्‍या देशी – विदेशी पर्यटकांसाठी निश्‍चितच ते आकर्षण ठरेल. तेथे पर्यटकांसाठी गोवा सरकारला हवे असेल तर ध्वनी व चित्र कार्यक्रम किंवा लेझर शो आयोजित करता येईल असेही गडकरी यांनी सांगितले. मुरगाव बंदराच्या विस्तारात जागेची उपलब्धता हा एक प्रमुख अडसर आहे, परंतु मुरगाव बंदराची खोली वाढवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. तेथे अठरा मीटरच्या ड्राफ्ट चा म्हणजे खोलीचा निर्णय मंत्रालयाने घेतलेला आहे. निर्यातीसाठी मुरगाव बंदर विकसित करण्यात त्याची खोली हा एक मुद्दा अडथळा बनला होता, कारण ती कमी असल्यामुळे तेथे मोठी जहाजे येऊ शकत नव्हती. तो प्रश्न आता सोडवला गेला आहे. मुरगाव बंदराच्या विस्ताराचीही आमची तयारी आहे, परंतु त्यासाठी जमिनीची उपलब्धता गोवा सरकारने करून दिली पाहिजे. विमानतळाच्या पलीकडे जुवारी खत कारखान्याच्या परिसरात काही जागा उपलब्ध होऊ शकेल का अशी विचारणा आम्ही गोवा सरकारकडे केलेली आहे. जागेच्या प्रश्नावर काही तोडगा काढणे गोवा सरकारला शक्य झाले, तर मुरगाव बंदराच्या विस्तारास आपले मंत्रालय तयार असल्याचा निर्वाळाही श्री. गडकरी यांनी यावेळी दिला.
मुरगाव बंदराला जोडणार्‍या उच्च पातळीवरील मार्गाचे (एलेव्हेटेड रोड) काम सुरू झाले पाहिजे. या बंदराला रेल्वेने कर्नाटकला जोडण्यात आल्याविना या बंदरातून मोठी उलाढाल होणार नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टी झाल्या तर मुरगाव बंदराचा विकास निश्‍चित होईल असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
मुंबईच्या पत्र सूचना कचेरीतर्फे आयोजित या व्हिडिओ लिंक वार्तालापात पत्र सूचना कचेरीच्या देशातील अकरा केंद्रांतील निवडक पत्रकार सहभागी झाले होते. मुंबई भेटीवर आलेल्या गडकरींनी तेथील मंत्रालयातून हा वार्तालाप केला.

‘सागरमाला’ ला सर्वतोपरी
सहकार्य करू ः मुख्यमंत्री
‘सागरमाला’ अंतर्गत जलमार्गांच्या कामात कोणते अडथळे येत आहेत याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत त्यांच्या गोवा भेटीवेळी आज शनिवारी बैठक घेतली जाईल व त्यांच्या मंत्रालयाला आवश्यक असलेले सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘नवप्रभा’ ला दिली. बंदरांच्या अध्यक्षांच्या परिषदेसाठी गोवा भेटीवर येणार्‍या गडकरी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक घेऊन ‘सागरमाला’ च्या मार्गातील अडथळे दूर केले जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुरगाव बंदराशी संबंधित
२८३३ कोटींची विकासकामे
गोव्यात बंदराशी संबंधित २८३३ कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. त्यात वास्को येथे ८० कोटी खर्चून फिंगर जेटीची उभारणी, बर्थ क्र. ८ व ९ चे सुमारे १०८५ कोटी रुपये खर्चून बहुद्देशीय टर्मिनलमध्ये रुपांतर, १५० कोटी रुपये खर्चून बर्थ क्र. ३ चे बहुद्देशीय टर्मिनलमध्ये रुपांतर यांचा समावेश आहे. १४५८ कोटी खर्चून होस्पेट – हुबळी – लोंढा – तिनईघाट – वास्को दरम्यान बंदर जोडणी व ५० कोटी रुपये खर्चून अवजड मालवाहतुकीसाठीच्या रस्ता योजनेचाही त्यात समावेश आहे.