गोवा विद्यापीठाकडून अखेर क्रीडा गुणांचा प्रश्न निकालात

0
11

काँग्रेसेच आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्या मध्यस्थीनंतर गोवा विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वेच्छेने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा प्रश्न अखेर सोडविला आहे. गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी 17 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून सेवा देणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यास मान्यता दिली होती; परंतु कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने संपर्क करूनही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळूनही गुण देण्यास विलंब होत असल्यामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती आमदार ॲड. फेरेरा यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली होती. गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या परिपत्रकानंतरही गुण देण्यास विलंब होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. फेरेरा यांनी कुलसचिवांकडे ह्याबाबत विचारणा केली. विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा हा प्रकार असून निर्णय न घेतल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे फेरेरा यांनी कुलसचिवांना सुनावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुलसचिवांनी व्हॉट्सॲप मेसेजद्वारे संपर्क साधून कुलगुरूंशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विद्यापीठ हे परिपत्रक विचारात घेऊन सुधारित निकाल जाहीर करणार आहे, असे आमदार ॲड. फेरेरा यांनी सांगितले.