गोवा लोकसेवा आयोगात राजकीय हस्तक्षेप टाळावा

0
16

>> राज्यपाल पिल्लई यांची सूचना

गोवा लोकसेवा आयोग राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्याची गरज आहे. लोकसेवा आयोगाने कामकाज निःपक्षपाती केले पाहिजे. तसेच, सरकारी नोकरीसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ईडीसी हाउस पणजी येथे गोवा लोकसेवा आयोग कार्यालयाच्या विस्तारित विभागाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल केले.

आपण लोकांचे सेवक आहोत आणि लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. गोव्याला भारतातील सर्वांत आनंदी राज्य बनविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही राज्यपालांनी सांगितले.
याप्रसंगी राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जीपीएससीच्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जोस मॅन्युएल नोरोन्हा, जीपीएससीचे सदस्य प्रा. (डॉ.) सुखाजी नाईक, जीपीएससीचे सचिव यतिंद्र मरळकर उपस्थित होते.