>> अध्यक्ष उल्हास फळदेसाईंची पत्रपरिषदेत माहिती
गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून ३१ मार्च २०२१ अखेर बँक नफ्यात येणार आहे. वर्ष २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात बँकेला २४ कोटी रुपयांचा नफा उपेक्षित आहे. बँकेचा नेट एनपीए ५.५७ टक्यावर आलेला आहे. त्यामुळे ग्राहक, ठेवीदारांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत घाबरून जाऊ नये, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केले.
रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने काहीजणांनी गोवा राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारत आहे. थकबाकी वसुलीवर जोर देण्यत आलेला आहे. राज्यातील खाण बंदीनंतर बँकेच्या पुढील वाटचालीबाबत आराखडा तयार करण्यात आलेला असून ह्या आराखड्यानुसार बँकेची वाटचाल सुरू आहे. वर्ष मार्च २०२१ अखेर बँक निश्चित नफ्यात येणार असून भागधारकांना लाभांश देणे शक्य होणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
बँकेच्या मागील दोन वर्षाच्या ऑडिटवर निर्णय घेण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला खास आमसभा घेतली जाणार आहे. या आमसभेत बँकेच्या आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटरच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ऑडिटचे काम पूर्ण करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी लागणार आहे.