गोवा मुक्तीदिन ः एक आढावा

0
343
  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई
    (वास्को)

वर्ष २००० नंतर म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये गोवा खर्‍या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात सम्मिलीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आल्याने पर्यटनाला चालना मिळाली.

बर १९६१ या दिवशी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले. भारताचा हा भाग स्वतंत्र झाल्यानंतरच संपूर्ण भारत देश फिरंगी राजवटीतून मुक्त झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन विजयच्या पराक्रमामुळे आम्ही ४६१ वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. आज सहा दशकांनंतर आमच्या गोव्यामध्ये आमुलाग्र बदल झालेला आम्हाला दिसून येतो.

सुरवातीच्या काळात दमण आणि दीव हे गुजरात राज्याला जोडून असलेल्या भागाबरोबर संघ प्रदेश म्हणून गणली जात होती. परंतु १९६७ साल हे गोव्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल कारण- १७ जानेवारी १९६७ या दिवशी लोकशाहीनुसार सर्वप्रथम थेट पद्धतीने जनमत कौल घेण्यात आला ज्यामध्ये गोवा प्रांत महाराष्ट्रात विलीन व्हावा की नाही हा विषय ठेवण्यात आला होता. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी हा खास तरतूद गोव्यासाठी उपलब्ध करून दिली. जनमतकौलाचा निर्णय – गोवा हा स्वतंत्र प्रदेश रहावा या दिशेने देण्यात आला. त्यानंतर जवळजवळ १९८७ पर्यंतच्या कालावधीत गोव्याचा शैक्षणिक स्तरावरील विकास ठळकपणे दिसून आला. गोवा १९६१ मध्ये मुक्त झाल्यामुळे या प्रांताला दोन पंचवर्षीय योजनांचा लाभ मिळू शकला नाही. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी प्राथमिक शिक्षणावर भर देऊन जवळजवळ एक हजार प्राथमिक शाळांचे जाळे विणण्यास प्राधान्य दिले. परंतु गोवा प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित राहिला- जसे आरोग्य, पाणी, वीज, रस्ते इ.
गोव्यात शशिकलाताई काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांच्या कार्यकाळात आरोग्य क्षेत्रात बरीच प्रगती झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कदंबा महामंडळाची स्थापना झाल्यावर गावागावांची प्रगती साध्य होऊ लागली. आरोग्याच्या क्षेत्रात प्राथमिक तसेच तालुका स्तरावर आरोग्याच्या नव्या पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा स्तरावर हॉस्पिसियो तसेच आझिलो आणि राज्य स्तरावर गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये झपाट्याने विकास होऊ लागला. अर्थातच गोव्याचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे, तसेच येथील लोकसंख्या कमी असल्यामुळे येथील जनता शिक्षणाचा लाभ चांगल्या प्रकारे उठवू शकली आणि विकास साधणेही सोपे झाले. पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात क्षेत्रफळाने छोटा असलेला गोवा हा देशातला वेगळा प्रांत म्हणून अस्तित्वात आला. गेल्या तीन दशकांमध्ये गोवा राज्याने वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. नव्वदीच्या दशकात राजकीय अस्थिरतेमुळे दहा वर्षांत दहा सरकारे गोव्याने पाहिलीत. वर्ष २००० नंतर म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये गोवा खर्‍या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात सम्मिलीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आल्याने पर्यटनाला चालना मिळाली. क्षैक्षणिक क्षेत्रात- ग्रॉस एन्‌रोलमेंट रेशो (जीईआर्)च्या परिमाणानुसार छोट्या राज्यांच्या रांगेत आज गोवा अग्रेसर झालेला आहे. तसेच साधन सुविधा महामंडळाच्या वतीने पूल, शाळा, बंधारे, रस्ते इत्यादींच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. पण आजच्या घडीला मात्र जगात आलेल्या आर्थिक मंदीमुळे गोव्याचा विकास काही प्रमाणात रखडलेला आपल्याला दिसतोय.

बेकारीच्या भस्मासुरानं मात्र नवं स्वरूप धारण केलंय. खाण व्यवसायावर बंदी आणल्यामुळे बेकारीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज पर्यटन आणि शेती उद्योगाला नव्याने चालना मिळवून देण्याची गरज आहे. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी पर्यटनाचे वेगवेगळे स्रोत तपासून आणि त्यांच्यावर अभ्यास करून निसर्ग आणि आरोग्यदायी पर्यटनाला वाव देण्याची आज गरज आहे. तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग तसेच कौशल्य विकासाच्या सुविधा निर्माण करून स्टार्ट अप, तसेच स्टँड अप या योजना मिशन पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज आहे. आज गोव्याची लोकसंख्या जरी १५ लाखाच्या आसपास (२०११ सेंसस) असली तरी प्रत्यक्षात जवळजवळ २५ लाख लोक गोव्यामध्ये वास्तव्य करीत आहेत. यात स्थलांतराचे प्रमाण फार आहे. आज गोव्याचा नकाशा ‘मिनी भारता’चं स्वरूप घेऊन आहे. यामध्ये षट्‌पूजा, गुरुनानक जयंती, बौद्ध पौर्णिमा, ईद इत्यादी विविध धर्मांचे सोहळे आपल्याला साजरे होताना दिसतात. पण गोव्याच्या स्थानिक लोकांचे हीत लक्षात घेता गोवा सरकारने जमिनीची लेद-देन ठीक होण्यासाठीच्या कायद्यांत योग्य तो बदल करण्याची व इथल्या भूमीपुत्रांना संरक्षण देण्याची गरज आहे.

गोव्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा सर्वांना देताना गोव्याचे आजचे ‘कॉस्मोपॉलिटन लुक’ सांभाळून त्यात निसर्ग, पर्यावरण इत्यादी बाबींचे रक्षण करण्याची आज गरज आहे. हे जर साकारता आलं तर गोवा हे भारत देशाचे आदर्श राज्य बनू शकेल. गोव्याचा विकास आपल्या गोवेकरांना राष्ट्रीय प्रवाहात संम्मिलीत करण्यास मदतगार ठरेल यात शंकाच नाही!