गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवाचे कार्यक्रम निश्‍चित

0
267

>> समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष कसे साजरे करायचे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी निवडण्यात आलेल्या समितीच्या काल झालेल्या बैठकीत वर्षभरासाठीचे कार्यक्रम निश्‍चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना दिली.
या महोत्सवी वर्षाचा मुख्य कार्यक्रम येत्या १९ डिसेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. हा कार्यक्रम पणजी जिमखाना मैदानावर होईल. या कार्यक्रमासाठी केवळ २०० लोकांनाच निमंत्रण असेल.

मुक्तिलढ्यावर लघुपट
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त गोवा मुक्ती लढ्यावर आधारित एका लघुपटाची निर्मिती करण्यात येणार असून हा लघुपट नंतर सर्वत्र दाखवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘अक्षरग्रंथ’चे प्रकाशन
गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची माहिती देणारा ‘अक्षरग्रंथ’ प्रकाशित केला जाणार आहे. त्याशिवाय गोव्याच्या इतिहासाविषयीची माहिती देणारे १००१ प्रश्‍न व त्यांची उत्तरे असलेले एक इतिहास विषयक पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार आहे.

प्रचारगीत
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताच्या धर्तीवर गोव्यावर एक प्रचार गीत तयार केले जाईल. गोव्यातील आघाडीचे गायक कलाकार व अन्यांना या व्हिडिओ गीतासाठी संधी दिली जाईल.

बोधचिन्ह व रिंगटोन
हीरक महोत्सवानिमित्त एक विशेष बोधचिन्हही तयार केले जाणार असून त्यासाठी स्पर्धा घेतली जाईल. त्याशिवाय एका रिंगटोनचीही निर्मिती केली जाणार आहे. वर्षभरात सर्व हयात असलेल्या व नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जाईल. तसेच राज्यातील प्रतिभावान कलाकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ गोवा’ या गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्ली, मुंबईसह विविध राज्यांतील शहरांतही कार्यक्रम केले जातील.

सेंट्रल लायब्ररीत विशेष दालन
गोव्याची संस्कृती, इतिहास आदीचे दर्शन घडवणारे एक दालन सेंट्रल लायब्ररीत उघडण्यात येणार असून ते २४ तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा फॉरवर्डचा बहिष्कार
दरम्यान, या कार्यक्रमाला विरोध दर्शवत गोवा फॉरवर्ड पक्षाने या बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र या बैठकीला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आदी उपस्थित होते.