गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांना लवकरच पगारवाढ

0
285

>> १५ हजारांपर्यंत वाढीचा प्रस्ताव

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामध्ये सुरक्षा रक्षक व इतर पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मधुकर पळ यांनी दिली.

पगार वाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांचा पगार महिना १४ हजार ते १५ हजार रुपयांवर जाणार आहे. सुरक्षा रक्षक व इतर कर्मचार्‍यांना चांगला पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या सुरक्षा रक्षकांना सुरुवातीला ९५०० रुपये पगार दिला जातो, असेही पळ यांनी सांगितले.
महामंडळातर्फे कर्मचार्‍यांना पीएफ, ईएसआय, ग्रेज्युटी, सुट्टी व इतर सुविधा दिल्या जातात. सुरक्षा रक्षकांना तीन महिने प्रशिक्षण दिले जाते. तसेच हाउस कीपिंगच्या कर्मचार्‍यांनाही दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. सरकारी खात्यातील शिपाई, वाहन चालक, लिफ्टमन, गार्डनर यांसारख्या कामांसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची महामंडळाची तयारी आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, असेही पळ यांनी सांगितले.

६०० सुरक्षारक्षकांसाठी अडीच हजार अर्ज
गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या नोकरभरतीला भरघोस प्रतिसाद लाभत असून सुरक्षा सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षकांच्या ६०० जागांसाठी २६१० जणांनी अर्ज केले आहेत. शारीरिक चाचणी ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान कांपाल, पणजी येथील मैदानावर घेतली जाणार आहे. शारीरिक परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक पळ यांनी दिली. महामंडळाकडून ४२ सरकारी खात्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. महामंडळाकडे सध्या १६०० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात तीनशेच्या आसपास सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. तसेच २५० हाऊसकीपिंगचे प्रशिक्षण देऊन विविध सरकारी खाती, सरकारी रेस्टहाऊस, सरकारी हॉटेल या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे, असेही श्री. पळ यांनी सांगितले.