गोवा भ्रष्टाचारमुक्त करणार

0
86

>>केजरीवालनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

निसर्ग सौंदर्याने समृध्द असलेला गोवा भाजप व कॉंग्रेसच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा बळी ठरला आहे, असे सांगून सुमारे दहा हजारांच्या जनसमुदायांच्या उपस्थितीत आम आदमीचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१७ साली होणार्‍या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजप व कॉंग्रेसच्या विरोधात दिल्लीतील जनतेने ज्या पध्दतीने लढा दिला, त्याच धर्तीवर गोव्यातही प्रामाणिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी सर्व धर्मियांना म्हणजे सामान्य लोकांना घेऊन निवडणूक लढविण्याचा केजरीवाल यांनी निर्धार व्यक्त केला.

लोकशाहीत नेते मोठे नसतात. सामान्य लोकांना गृहीत धरता येत नाही. तसे केल्याने काय परिणाम होतो हे दिल्लीतील कॉंग्रेस-भाजप नेत्यांनी पाहिले आहे, असे ते म्हणाले.
सत्याच्या मार्गाने जाणार्‍या बरोबर परमेश्‍वराच्या रूपाने वैश्‍विक शक्ती असते. आम आदमी पार्टी बरोबर ती होती. त्यामुळेच दिल्लीत सामान्य वर्गातील आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी बड्या धेंडांचा पराभव केला असे केजरीवाल यांनी सांगितले.
भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई
दिल्लीत आपले सरकार स्थापन झाल्यानंतर आम आदमीच्याच एका मंत्र्यांसह अनेक बड्या धेंडांवर, सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई केली. गैरकृत्य करणारा आपला मुलगा जरी असला तरी त्याच्याविरुध्द कारवाई केली जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पर्रीकरांवर टीका
गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेसने केलेल्या खाण घोटाळा, कॅसिनो घोटाळा, जमीन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची नावे घेऊन आपल्या पक्षाचे राज्य प्रस्थापित केले. परंतु कारवाई कुणावरही केली नाही. पर्रीकर यांच्याजवळ कॉंग्रेसच्या काळातील मंत्र्यांच्या फाईल्स आहेत तर कॉंग्रेस नेत्यांकडे पर्रीकर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या फाईल्स आहेत, परंतु कुणीही कुणावरही कारवाई करीत नाहीत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पर्रीकर यांनी गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केला. निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांना हरताळ फासला, असा घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला.
पर्रीकर यांचे संरक्षण खात्यावर लक्ष नाही ते आठवड्यातील दोन दिवस गोव्यात येतात व तेच येथील सरकार चालवित असतात, असे सांगून सध्या गोव्यात कठपुतळीचे सरकार असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील जनतेने कॉंग्रेस भाजप विरोधी लढा देण्यासाठी त्याग केला. काही लोक महिनाभर रजेवर जाऊन आम आदमीचे काम केले तर काहिंनी आपले व्यवसायही बंध ठेवले होते. त्यांच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात चीड होती.
गोव्यातील जनतेच्या मनातही त्याच प्रकारची चिड आहे, याचे दर्शन या मैदानावर घडत आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर देशाने लुटारू सरकारेच पाहिली. अनेक पिढ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत ७०% भ्रष्टाचार कमी
दिल्ली प्रशासनात जवळजवळ ७० टक्के भ्रष्टाचार कमी झाला आहे. त्यामुळेच दिल्लीतील नागरिकांना स्वस्त दरात वीज व मोफत पाणी तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले. शिक्षण क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पात आपल्या सरकारने शंभर टक्के वाढ केली आहे. गोव्यात सुशिक्षीत युवकांसमोर बेरोजगाराचा प्रश्‍न आहे त्यामुळे वर्षाकाठी ६ हजार युवक विदेशात जात आहेत. ही परिस्थिती बदलण्याची गरज केजरीवाल यांनी व्यक्त केली. दिल्लीत सरकारी शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण होत आहेत तर गोव्यात सरकारी शाळा बंद पडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आम आदमीची गरज आहे.
गोव्यात पर्यटनाची व्याख्या बदला
पर्यटन हा गोव्याचा महत्वाचा व्यवसाय आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता आला पाहिजे, परंतु कॉंग्रेस व भाजपने लैंगिक पर्यटन करून टाकले आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आपले सरकार स्थापन केल्यानंतर मुकेश अंबांनीसह अनेक बढ्या धेंड्याच्या विरोधात गुन्हे नोंद केले, परंतु भाजप सरकारने काहीच कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केला. पणजी येथील बांदोडकर मैदानावर झालेल्या या सभेस ४० ते ४५ वयोदरम्यानच्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यापूर्वी कोणत्याही सभेस उपस्थित न राहणारे नागरिक प्रथमच चार तास उन्हात ताटकळत होते. या सभेत पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता, पंजाबचे खासदार भागवान मान, दिनेश वाघेला, राज्य सचिव वाल्मिकी नायक, डॉ. सोनिया आदींची भाषणे झाली. तत्पुर्वी फ्रान्सिस तुये या कलाकारांने राजकारणावरील कातारे सादर करून वातावरण तयार केले. शेवटी राजश्री नगशेंकर यांनी आभार मानले. सभा सुरू असताना जनरेटरच्या वाहिनीत शोर्टसर्किट झाल्याने काहीवेळ व्यत्यय आला परंतु मैदानावरील जनसमुदायावर त्याचा परिणाम जाणवला नाही.

रापणकारांचा अपेक्षाभंग

दरम्यान, गोवा वेल्हा येथे गोवा रापणकारांचो एकवोटतर्फे रापणकारांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी एक छोटीशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रापणकार आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या श्री. केजरीवाल यांच्याकडे मांडणार होते. बैठकीच्या वेळेनुसार सर्व रापणकार त्या ठिकाणी जमाही झाले होते. मात्र सभेच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल व त्यांची टीम गोवा वेल्हा येथे न थांबता तडक सभेच्या ठिकाणी गेले. त्यामुळे रापणकारांचा मात्र अपेक्षाभंग झाला. त्याचप्रमाणे या बैठकीला कोणतीही सुरक्षाही पुरवण्यात आली नव्हती.