गोवा-बंगळुरू यांच्यात थरारक बरोबरी

0
104

>> इगोर अँग्युलोचे चार मिनिटांत दोन गोल

सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एफसी गोवा आणि बंगळुरू एफसी या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील लढत निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरीत सुटली. दोन गोलांच्या पिछाडीनंतर गोव्याने पारडे फिरवित एक गुण खेचून आणला. स्पेनचा ३६ वर्षीय स्ट्रायकर इगोर अँग्युलो याने चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत गोव्याला तारले. बंगळुरूने पहिल्या सत्रात आणि दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी गोल करीत उपयुक्त आघाडी घेतली होती, पण आक्रमक शैलीच्या गोव्याने आपली प्रतिआक्रमणातील क्षमताही अधोरेखित केली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. पूर्वार्धात ब्राझीलचा क्लेईटन सिल्वा, तर उत्तरार्धात जुआनन यांनी बंगलोरकडून गोल केले.

गोव्यासारखा आक्रमक शैलीचा प्रतिस्पर्धी समोर असूनही खाते उघडण्याची शर्यत बंगळुरूने जिंकली. पहिल्या सत्रात अर्ध्या तासाचा खेळ संपण्याच्या मार्गावर असताना मध्य फळीतील हर्मनज्योत खाब्रा याने चाल रचली. त्याने थ्रो इनच्या संधीचा फायदा उठवित चेंडू गोलक्षेत्रात भक्कमपणे टाकला. त्याने चेंडूला उंचीही चांगली दिली. गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे मेंडोझा याने हेडिंगच्या जोरावर चेंडू बाजूला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेेंडू नेटसमोरच गेला. सिल्वाने मग पुढे सरसावत चपळाईने हेडिंग करीत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकविले.
दुसर्‍या सत्रात बंगळुरूने आघाडी वाढविली. मध्य फळीतील एरिक पार्टालू याच्या चालीवर बचाव फळीतील जुआनन याने गोल केला. डेशोर्न ब्राऊन याने हेडिंगकरवी चेंडू पार्टालूच्या दिशेने मारला. मग पार्टालूने हेडिंगवरच जुआननसाठी संधी निर्माण केली. जुआनन याने गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकवित दमदार फिनिशिंग केले.

गोव्याने मग प्रतिआक्रमण रचले. मध्य फळीतील सॅन्सन परेराने डावीकडून चाल रचत बदली खेळाडू ब्रँडन फर्नांडीसला पास दिला. आणखी एक बदली खेळाडू अल्बर्टो नोग्यूला याने ही चाल पुढे नेली. यातून संधी मिळताच अँग्युलोने गोल करीत गोव्याचे खाते उघडत पिछाडीही कमी केली. यानंतर गोव्याने तीन मिनिटांत बरोबरी साधली. ५७व्या मिनिटाला प्रिन्सटन रेबेलो याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या ब्रँडन यानेच ही चाल रचली. त्याने आणखी एक बदली खेळाडू अलेक्झांडर जेसुराज याला अप्रतिम पास दिला. गोलक्षेत्रात उजवीकडून चेंडू मिळताच एदू बेदीयाच्या साथीत चाल पुढे नेली. मग बेदीयाने संतुलन साधत अँग्युलोच्या दिशेने चेंडू मारला. अँग्युलोने छातीच्या मदतीने चेंडूवर नियंत्रण मिळवित सफाईदार फिनिशिंग केले.

कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या बंगळुरूची सुरवात सकारात्मक होती. दुसर्‍याच मिनिटाला त्यांनी पहिला प्रयत्न केला. आघाडी फळीतील क्रिस्टियन ओप्सेथ याने मध्य फळीतील एरिक पार्टालू याच्या साथीत आगेकूच केली होती. गोव्याला ही चाल सफाईने रोखता आली नाही. त्यामुळे सुनील छेत्रीला संधी मिळाली. त्याने नेटच्या दिशेने फटका मारला, पण तो स्वैर होता. पाचव्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे मेंडोझा याने चेंडूवर ताबा मिळवून डाव्या बाजूने मुसंडी मारली, पण बंगळुरुचा बचावपटू फ्रान्सिस्को गोंझालेझ याने ही चाल रोखली. दोन मिनिटांनी युवा आशिक कुरुनियन याने डावीकडून मुसंडी मारली. मग त्याने उजवीकडे वळत प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवून फटका मारला, पण नवाझने व्यवस्थित अंदाज घेत चेंडू रोखला.
गोव्याकडून पहिल्या थेट प्रयत्न पूर्वार्धाच्या अखेरीस झाला. आघाडी फळीतील इगोर अँग्युलो याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने तो अडविला.