टेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्?

0
285
  • प्रा. रमेश सप्रे

सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार शोषून घेणारी लवचिकता वेगानं नष्ट होत चाललीय. ही खरी धोक्याची घंटा आहे. ती वेळीच ऐकू या नि सावध होऊ या.

त्यादिवशी सत्संगासाठी हजारो भक्तभाविक जमले होते. काळ होता रामायणाचा. म्हणजे दूरदर्शनवरुन दर रविवारी अभूतपूर्व यश मिळवणारी रामानंद सागरांची ‘रामायण’ ही महामालिका प्रसारित केली जात होती तो काळ. त्याकाळात रविवारी कोणताही कार्यक्रम असला तरी आमंत्रण पत्रिकेवर हे लिहिणं जणू बंधनकारक होत.- ‘रामायण’ मालिका दाखवण्याची खास सोय केली आहे’. तरच श्रोते, प्रेक्षक साधक यायचे.

त्यादिवशीही रविवार होता. सद्गुरुंचा प्रातःसत्संग सुरू होता. त्याचा आरंभच सद्गुरुंनी या शब्दानं केला ‘टेलिविषम्!’ असं म्हणून त्यांनी नाट्यमय विराम (पॉज) घेतला. सर्वत्र रहस्यमय शांतता पसरली. सद्गुरु गंभीरपणे- जणू एखाद्या आकाशवाणीसारखे बोलू लागले.
खरंच आहे, दूरवरच्या घटनाप्रसंग घरबसल्या पाहण्यासाठी जे दिव्य साधन वैज्ञानिकांनी, तंत्रज्ञांनी तयार केलं त्याचा फार मोठा प्रभाव जनमानसावर पडू लागला. ‘रामायण’सारख्या भव्य मालिकांनी हे सिद्ध केलं. पण जे महाभारतातील संजयाचं झालं तेच दुर्दैवानं दूरचित्रवाणीचं झालं. इतकं तन्मय होऊन संजय वर्णन करतोय, ‘राजन् .. राजन्’ म्हणजे ‘हे राजा, धृतराष्ट्रा’ असं वारंवार म्हणतोय पण अंध धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. इतका की कणवकरुणेची साक्षात् मूर्ती ज्ञानोबा माऊलीही न राहवून त्याला ‘म्हातारा, म्हैसा’ असे त्यातल्या त्यात कठोर शब्द वापरते. त्याला ना त्या संजयाला अद्भुत वाटणार्‍या विश्‍वरूपाचं अप्रूप होतं ना संजयाला पुनःपुन्हा आठवणार्‍या त्या दिव्य कृष्णार्जुन संवादाचं आकर्षण होतं. त्याच्या विचारांची- भावनांची वाहतूक एकमार्गी होती- जो मार्ग जात होता दुर्योधनाकडे, कुलांगार (म्हणजे सार्‍या कुळाला जाळून टाकणार्‍या) दुर्योधनाकडे. ज्ञानोबामाऊली समर्पक शब्दात दुर्योधनाचं वर्णन करते –
पुत्रस्नेहे मोहितु! अंतर्बाह्य अंधू ॥
आपलं दूरचित्रवाणीबद्दल काहीसं असंच नाही का झालंय? एखादी ‘रामायण’ मालिका आपण अगदी भक्तीनं- सक्तीनं नव्हे बघतो पण इतर बराच वेळ आपण त्या ‘मूर्ख मंजुषे’समोर (इडियट बॉक्स) आसनाला चिकटून बसतो.

कुणी टी.व्हीला प्रथम ‘इडियट बॉक्स’ म्हटलं याची नोंद नाही. पण हा शब्द संस्कृत शब्दांसारखा सामासिक शब्द आहे त्याची फोड (विग्रह) दोन्ही बाजूनं करता येते- ‘मूर्ख बनवणारी पेटी म्हणजे इडियट बॉक्स’ किंवा ‘पेटीसमोर बसणारे मूर्ख’. पेटीचा काय दोष? ती तुम्हाला चालू करता येते तशीच बंदही करता येते. स्वतःच्या माहितीत, ज्ञानात, अनुभवात भर घालून आपलं व्यक्तिमत्त्व संपन्न करायला जशी ही दूरचित्रवाणी उपयोगी पडते तशीच अतिअधीन (व्यसनाधीन) बनवून आत्मनाशालाही कारणीभूत होते. मध्यंतरी आय्‌आय्‌टी, आय्‌आय्‌एम् यां्‌सारख्या तंत्रज्ञान नि व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षणसंस्थातून अनेक बुद्धिमान विद्यार्थ्यांनी आत्महत्या करताना त्यांच्या खोलीत आत्महत्येविषयी मार्गदर्शन करणारी वेबसाईट चालू असलेल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चालू असलेली पोलिसांना आढळली.

दोन-तीन उदाहरणं हृदयविदारक अशीच आहेत. अर्थात संवेदनशील व्यक्तीच्या.

  • ‘मरून पुन्हा जिवंत होण्याची कला’ असं एक संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. योगीसंतांना हे तंत्र अवगत असतं. एकदा पू. गोंदवलेकर महाराजांनी कुणालाही न सांगता याचं प्रात्यक्षिक केलं. वैद्यांना बोलावलं गेलं. त्यांनी नेहमीप्रमाणे नाडी, हृदयाचे ठोके, शरिराचं तापमान यांची तपासणी केली. नाकासमोर सूत धरून ते हालतंय का तेही पाहिलं. एक आरसा मागवून तोही नाकासमोर धरून त्याच्यावर थोडीतरी वाफ दिसतेय का हेही तपासलं. डोळे उघडून त्यातील जिवंतपणा सारं सारं पाहून सांगितलं की हे गेले. जिवंतपणाची कोणतीही खूण दिसत नाही. मग सुरू झालेली रडारड, काढले गेलेले दुःखाचे उद्गार हे सारं श्रीमहाराज साक्षीभावानं ऐकत होते. काही वेळानं त्यांनी पुन्हा ‘जान में जान’ आणली. ते झोपेतून उठल्यासारखे बसले. सर्वांना अर्थातच आनंद झाला. शांतपणे श्रींमहाराज म्हणाले, ‘हे एक तंत्र आहे. योगी लोकांना ते अवगत असतं.’
    हे झालं तपस्वी योग्यांचं. पण शाळेत जाणार्‍या एका नववीतल्या विद्यार्थ्याला एक संकेतस्थळ मिळालं ज्यात मरून जिवंत होण्याची कला किंवा तंत्र समजावून सांगितलं होतं. त्यानं खोलीची दारं बंद करून ते करून पाहिलं. त्यात तो यशस्वी झाला. दुसरे दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचं प्रात्यक्षिक मित्रांना दाखवताना त्यानं तो प्रयोग केला नि त्याचा रोखलेला श्‍वास परत सुरू झालाच नाही. काही दिवस वृत्तपत्रं, वृत्तवाहिनी (न्यूज चॅनल्स) यावर तो ब्रेकिंग न्यूज’ म्हणून गाजला एवढंच.
  • ‘आत्महत्या कारावीशी वाटते का? निर्णय पक्का झालाय ना? मग या क्रमांकावर संपर्क साधा’. सारा प्रकार स्वयंचलित रेकॉर्डिंगच्या स्वरूपात असायचा. संगणकावर सर्व माहिती पुरवली जायची. एका ‘डेथव्हॅन’ची जागा (जी रोज बदलती असायची) व क्रमांक सांगितला जायचा. त्या गाडीतही टी.व्ही. असायचे. मृत्यूला सामोरं जायचे अनेक प्रकार नि पर्याय यांचं प्रात्यक्षिक टी.व्ही.च्या पडद्यावर दाखवलं जायचं. उदा. विष, गळफास, रिव्हॉल्व्हर, विद्युत झटका (इलेक्ट्रॉक्यूशन्) देऊन क्षणात आयुष्याचा ‘दि एंड’ घडवणारी खुर्ची, शॉवर फिरवताच विषारी वायूच्या फवार्‍यानं येणारा मृत्यू असे अनेक पर्याय उपलब्ध असत. एका नोंदवहीत – स्वतःचं नाव- मोबाइल क्रमांक- ‘मी स्वखुशीनं माझं जीवन संपवतोय. माझ्यावर कोणताही, कोणाचाही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दबाव नाही’- या छापील निवेदनाखाली सही करावी लागे. अनेकांनी याचा उपयोग करून जीवनं संपवली. ज्या व्यक्तीनं डोकं वापरून ‘मानवतेच्या सेवेसाठी’ ही योजना सुरू केली त्याच्यावर अनेकांच्या खुनाचा आरोप ठेवून त्याला कोर्टात खेचलं. त्याने नम्रपणे कोर्टाला सांगितलं की स्वेच्छामरण (युथानासिया) किंवा दयामरण (मर्सी किलिंग) याला तुम्ही कायदेशीर परवानगी देत नाही. म्हणून मी हा मार्ग स्विकारला. त्यानं ती नोंदवही कोर्टाला दाखवली. सर्वांनी लिहिलं होतं. ‘गॉड ब्लेस यू!’- कोर्टानं त्याला निर्दोष ठरवतानाच, हा प्रकार तात्काळ बंद करण्याची आज्ञाही केली. असो.
  • ‘थ्री इडियट्‌स’ या अतिगाजलेल्या चित्रपटानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या. जरी तो त्या चित्रपटाचा बिलकुल उद्देश वा संदेश नव्हता. पण स्वप्नभंग झालेल्यांनी केलेला आपल्या जीवनाचा अंत त्यात एक भाग (आस्पेक्ट) म्हणून दाखवला होता. तो चित्रपट असंख्य मंडळींनी दूरदर्शनवर अनेकवार पाहिला. असो.

अशा प्रकारची एका टोकाची उदाहरणं सद्गुरू आपल्या सत्संगात देत होते. त्याचा प्रभावही भक्तभाविकांवर पडत होता. अशावेळी एक तेजस्वी युवक अचानक उभा राहिला नि त्या भयाण शांततेला चिरत त्यानं नम्रपणे एक प्रश्‍न विचारला- ‘गुरुदेव, मान्य की दूरदर्शन हे टेलिविषम् आहे. पण त्याचवेळी ते ‘टेलिअमृतम्’ नाही का? आपल्यासारखे अनेक सत्पुरुष याच माध्यमातून एकाच वेळी असंख्य मंडळींवर अमृताची वर्षा करत नाहीत का?’
गुरूदेवांच्या प्रकाशित मुद्रेवर त्या प्रश्‍नाबद्दलचं समाधान नि तो विचारणार्‍या युवाबद्दलचं कौतुक स्पष्ट दिसत होतं. ते सहज उद्गारले, ‘तरुणा, माझ्या मनातले शब्द तू चोरलेस. माझं पुढचं वाक्य हेच असणार होतं…. टीव्ही जसा टेलिविषम् बनून विषारी विचारांचा फवारा आपल्यावर मारतो तसाच तो टेलिअमृतम् बनून आपल्यावर संजीवक अमृताचा वर्षावही करतो.’… मग विषयाचा उत्तरार्ध (नव्हे, अमृतार्ध) झाल्यावर गुरुदेव हसत म्हणाले, ‘चला मंडळी, आता टेलिअमृतम्‌चा अनुभव घेऊया. रामायण काळात जाऊन रामरसवाहिनीत यथेच्छ पावन स्नान करुया.’
खरंच विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विविध यंत्रांना, साधनांना, माध्यमांना स्वतःची आवड-नावड नसते, म्हणूनच निवडही (चॉइस) नसते. ती असते – असायला पाहिजे- या यंत्र-साधनांचा उपयोग करणार्‍यांना. दुर्दैवानं ‘कळतं पण वळत नाही’ या न्यायानं याहिबाबतीत आपलं दुर्योधनासारखं असतं. योग्य काय ते कळतं पण ते आपण स्वीकारत नाही आणि अयोग्य काय हेही कळतं पण ते आपण टाळू शकत नाही. खरं म्हणजे ते आपण टाळत नाही – टाळू इच्छित नाही. हीही एकप्रकारची आत्महत्याच!

हे असं का होतं? याचं कारणही उघड आहे. कारण जे सात्त्विक, स्वच्छ, सोज्वळ असतं ते काहीसं बेचव, नीरस असतं. गाईच्या धारोष्ण दुधासारखं! यात आपण साखर, चहा, कॉफी टाकून निरनिराळी पेयं बनवतो जी रुचकर, उत्तेजक वाटली तरी कमी पौष्टिक नि अहितकर असतात. अगदी कोजागरीच्या रात्रीसुद्धा दुधात साखर, वेलची, मसाला घातला जातो. हा प्रकार वाईट नाही पण साखरेचा अतिरेक झाला तर हानिकारकच असतो. हे एक सांस्कृतिक उदाहरण दिले.
गंमत म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रत्येक साधनाला किंवा उपकरणाला एक बटन असतं. स्विच ‘ऑन’ नि ‘ऑफ’ करण्याचं. इतर संसारोपयोगी मिक्सर, वॉशिंग मशीन अशा वस्तूंचा स्विच आपण ऑन् करतो, योग्यवेळी ऑफही करतो.

पण दूरचित्रवाणीबद्दल आपण असा स्विच असूनही तो ऑन करायला विसरत नाही पण हातात रिमोट असला तरी ऑफ करत नाही. सर्फिंग, ब्राउजिंग किंवा असंच काहीतरी करत वाहिन्या बदलत राहतो, तुकड्यातुकड्यांनी निरनिराळे कार्यक्रम बघत राहतो. आवडत नसले तरी जणू कुणीतरी सक्तमजुरीची शिक्षा दिलीय किंवा कोणत्यातरी अदृश्य शक्तीनं आपल्याला पछाडलंय. खरं ना?
अशा परिस्थितीत करायचं काय? सोपं उत्तर अग्नी भांड्याखाली ठेवून सुग्रास जेवण बनवायचं, तोच अग्नी घराच्या छपरावर ठेवून घर नाही जाळून टाकायचं? अग्नी हा खरा गृहपती (हेड ऑफ द फॅमिली) असतो. त्याला ‘गार्हृपत्य’ अग्नी म्हणतात. त्याला आगलाव्या अग्नी बनवायचं नाही.
*** हल्ली एक नवीन प्रकारचा अतिव्यसनाचा (ऍडिक्शन) प्रकार आलाय. पुण्याच्या ‘मुक्तांगण‘ या अतिव्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांचं जीवनात पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) करण्याच्या केंद्रातील एका अधिकारी व्यक्तीशी संवाद झाला तो असा…
‘सध्या कोणत्या व्यसनाधीन व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे? – साखळी धूम्रपान करणार्‍या, (चेन स्मोकर्स), दारूच्या आहारी गेलेल्या (अल्कॉहॉलिक) की ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या?’
या प्रश्‍नावर लगेच उत्तर आलं, ‘‘यापैकी कोणीही नाही’’.
‘म्हणजे?’
‘स्क्रीन ऍडिक्ट’ व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे.
‘समजलं नाही’.
‘मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट्‌स, संगणक नि टी.व्ही. यासार्‍यांचं काम पडद्यावरच चालतं ना? ऑन स्क्रीन डिस्प्ले (ओ. एस. डी.)’
‘बाप रे! हे लक्षातच नाही आलं. पण अशी माणसं इथं ऍडमिट् केलीयत?’
अर्थातच एका स्वतंत्र वॉर्डमध्ये!
सांगायला नको हे सारे टेलिविषम्‌चे बळी आहेत. ‘टेलिअमृतम्’चे नाहीत.
या संदर्भात एक दैवदुर्विलास सांगण्यासारखा आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध दिनदर्शिकेनं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात ‘दूरदर्शन पाहण्यासंदर्भात (टी.व्ही. व्ह्युइंग) एक सर्वेक्षण केलं. त्याचे निष्कर्ष धक्कादायक म्हणजे अपेक्षेच्या विपरीत होते.
एक प्रश्‍न विचारला गेला- घरात दूरदर्शन संचासमोर (टी.व्ही. सेट म्हणजेच आपली इडियट बॉक्स) जास्तीत जास्त वेळ कोण बसून असतं?
उत्तर होतं – आज्जी- आजोबा, नंतर आई-बाबा आणि नंतर बच्चे कंपनी.
आश्चर्य वाटलं ना?- पण विचार करा- मुलांना शाळा- शिकवणी- गृहपाठ- प्रकल्प (प्रोजेक्ट्‌स किंवा असाइनमेंट्‌स) शिवाय संगीत- पोहणं- बुद्धिबळ इ.इ.इ.चे क्लासेस! यातून वेळ मिळालाच तर टीव्हीच्या पडद्यासमोर!
आईबाबांना नोकरी- व्यवसाय सोडला तर जरा अधिक वेळ मिळतो.
पण आज्जीआजोबांना अख्खा दिवस (नव्हे उरलेलं आयुष्य!) दूरदर्शनला देण्यासाठी असतो. विचार करा.

हे मान्य की लहान पोर सारखं कार्टून पाहून स्वतःच कार्टून बनेल.
पण आजी-आजोबा त्या भडक नि झगमगीत दिसणार्‍या, प्रभावी संवाद अभिनय असलेल्या पण प्रत्यक्षात कालबाह्य रूढी, परंपरा (याला सांस्कृतिक जिर्णोद्धार म्हणायचं?) झगमगाटी स्वरूपात दाखवणार्‍या, भरपूर अंधश्रद्धा वाढवणार्‍या नि प्रत्यक्ष जीवनातील वास्तवाशी दुरूनही संबंध नसलेल्या तथाकथित हजारो भागांच्या महामालिका टी.व्ही.च्या पडद्याला डोळे चिकटवून पाहतात. त्यांचं काय? या प्रश्‍नाचं उत्तर ज्याचं त्यानं शोधावं.
पण कोविदच्या आरंभीच्या काळात मालिका ठप्प झाल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णांच्यात ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती. यात चांगली नि वाईट गोष्ट ही की सर्व वयोगटांच्या दर्शकांसाठी कार्यक्रम असतात ज्यातले अनेक अवास्तव नि मनंबुद्धी विषारी करणारे किंवा नशील्या द्रव्यांच्या प्रभावासारखे असतात.

यात खरोखर अतिशयोक्ती नाही.
सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार शोषून घेणारी लवचिकता वेगानं नष्ट होत चाललीय. ही खरी धोक्याची घंटा आहे. ती वेळीच ऐकू या नि सावध होऊ या.
आज आहे ‘जागतिक दूरचित्रवाणी दिवस’. प्रचंड क्षमता असलेलं हे साधन किंवा माध्यम. संगणक- लॅपटॉप आणि दुनिया खरंच मुठ्ठीमें आणणारा मोबाइल ही सारी त्याचीच अपत्यं आहेत. ज्यावेळी इंटरनेट संगणकीय महाजाल- प्रत्यक्षात आलं तेव्हा ते स्वर्गातून आलेलं माध्यम (तंत्र) वाटलं पण शेवटी आजचं युगच व्यापारी, बाजारू युग आहे. केवळ पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी जी तंत्रं वापरली गेली. त्यात टी.व्ही.चा अमृतमंत्र काहीसा झाकोळला गेला. तो पुन्हा झळाळून येण्यासाठी टी.व्ही.चा भद्र म्हणजे विधायक, रचनात्मक उपयोग अधिकाधिक करण्याचा संकल्प करू या. महासंगणकांच्या जाळ्यात (इंटरनेट) अडकून माशांसारखं तडफडत राहण्यापेक्षा चांगल्या संकेत स्थळांना (डब्लू डब्लू डब्लू) भेटी देऊन स्वतःच्या विकासाचं नि परस्पर संबंधांचं जाळं विणू या (वेब). कोळ्याच्या जाळ्यासारखं नाजूक, सुंदर, कशिद्यासारखं! स्वतःला कधीही न गुरफटणारं, बांधून घालणारं. हीच खरी श्रद्धांजली आजच्या दिवशी टीव्हीचा निर्माता जॉन बेअर्ड याला असेल, हो ना?