गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षावर एसीबीत भ्रष्टाचाराची तक्रार

0
219

पणजी (प्रतिनिधी)
युनायटेड गोवन्स फाउंडेशनने (युजीएफ) गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष तथा जलस्रोत मंत्र्यांचे माजी खास अधिकारी दुर्गादास कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून मुख्य सचिव, मुख्य दक्षता अधिकारी आणि दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेच्या (एसीबी) पोलीस अधीक्षकांकडे १२ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली आहे.
जलस्रोत खात्याच्या एका कंत्राटदाराकडून २२ लाख ९६ हजार ९०८ रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. युजीएफचे अध्यक्ष डॉ. आशिष कामत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, कामत यांच्या फोंड्यातील घरातील बाथरूम फिटींग, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी, सीसीटीव्ही, फर्निचर, किचन साहित्य, प्लॅबिंग साहित्य, छताचे पत्रे आदी साहित्य खरेदीची बिले जलस्रोत खात्याच्या कंत्राटदाराने चुकती केली आहेत. ही खरेदी सप्टेंबर – ऑक्टोबर २०१७ या काळात करण्यात आली आहे. तक्रारीसोबत बिले, डिलिव्हरी चलन आदींच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. सदर खरेदीच्या वेळी दुर्गादास कामत हे मंत्र्याचे खास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार करण्यात आली आहे, असेही डॉ. कामत यांनी सांगितले.
एसीबीने या प्रकरणी कसून चौकशी करून दुर्गादास कामत यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. कामत यांच्या मालमत्तेची सविस्तर चौकशी करावी. तसेच ज्या ठेकेदाराने बिलाची रक्कम फेडली आहे. त्याला देण्यात आलेल्या सर्व कंत्राटांची सविस्तर चौकशी करावी. तसेच दुर्गादास यांनी न्यायालयात दाखल केलेल्या पीआयएल आणि याचिकांची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. कामत यांनी केली आहे.