केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर यांचे प्रतिपादन
मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथील प्रवासी क्रूझ टर्मिनल पूर्णत्वास आल्यानंतर गोवा हे सागरी पर्यटनासाठी पश्चिम भारताचे मुख्य प्रवेशद्वार ठरेल असे प्रतिपादन काल केंद्रीय जहाजोद्योग मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी काल बायणा-वास्को येथील समारंभावेळी बोलताना केले.
केंद्रीय पर्यटन खात्याच्या आर्थिक सहाय्यातून मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथे ८ कोटी ७९ लाख रु. खर्चून बांधल्या जाणार्या प्रवासी क्रूझ टर्मिनलच्या पायाभरणी समारंभानंतर गुर्जर बोलत होते. देशाच्या जल पर्यटनात २०१७ पर्यंत २२.५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. तसेच विदेशी पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अधिक जवळून अनुभव घेता येईल असे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्याचे वीजमंत्री मिलिंद नाईक, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार कार्लुस आल्मेदा आदी उपस्थित होते.
गोवा हे हंगामी पर्यटन स्थळ न राहता पूर्ण वर्षभर पर्यटन केंद्र होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
मुरगाव बंदरातील प्रवासी टर्मिनलमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील, त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. मुरगाव प्रवासी टर्मिनलमध्ये सीमाशुल्क आणि इमिग्रेशन, सामानाची व्यवस्था, पासपोर्ट मशिन्स, सीसीटीव्ही नियंत्रण, सुरक्षा तपासणी, विनाकर खरेदी, मनोरंजनाची साधने, उपहारगृह, इलेक्ट्रिक कार या अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.
त्याआधी सकाळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते फर्मागुडी येथे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग या २८ कोटी रुपयांच्या तसेच मिरामार येथे ४० कोटी रुपये खर्चाच्या वॉटर स्पोटर्स कॉम्प्लेक्सचा पायाभरणी सोहळा पार पडला.