कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावर केलेली टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभागाला महाग पडली असून कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी माध्यम समिती तडकाफडकी विसर्जित केली. समितीची पुनर्रचना दोन आठवड्यांत करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे. मडगाव नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीसाठी स्थानिक आमदार कामत, आमदार रेजिनाल्ड यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाशी आघाडी केली आहे. त्याला फातोर्डा गट कॉंग्रेस समितीचा विरोध आहे. समितीने याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परीक्षेत कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी कामत आणि आमदार रेजिनाल्ड यांच्यावर गंभीर टीका केली होती. दिनेश राव यांनी त्या टीकेची दखल घेत समिती विसर्जित केली.