रुग्णांना मिळणार कमाल १ लाख रु.
गोवा कॅन्सर सोसायटीने राज्यातील गरीब कर्करोग रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, तसेच कॅन्सरसंबंधी संशोधन करणार्या व्यक्तीला डॉ. शरद वैद्य यांच्या नावाने वार्षिक ५ लाख रु.ची शिष्यवृत्ती देण्याचा व दर तीन महिन्यानी कॅन्सर चाचणी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोवा कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल येथे पत्रकार परिषद सांगितले.
रुग्णांना अर्थसहाय्य, कर्करोग संशोधन, कर्करोगावरील व्याख्याने व चाचणी शिबिरे यावर सोसायटी सुमारे २५ लाख रु. खर्च करणार असल्याचे धेंपो पुढे बोलताना म्हणाले.
दीड लाख रु. पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसलेल्या कर्करोग रुग्णांना उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख रु. एवढी आर्थिक मदत देण्यात येईल. ही मदत घेणार्या रुग्णाला दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात उपचार घ्यावा लागेल. कोणत्या रुग्णांला किती मदत द्यायची हे ठरविण्यासाठी सोसायटी वैद्यकीय समिती स्थापन करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मणिपाल इस्पितळाकडून प्रमाणपत्र आणावे लागेल. मूळ गोमंतकीय तसेच गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक असलेल्या रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे श्रीनिवास धेंपो म्हणाले. डॉ. शरद वैद्य कॅन्सर संशोधन शिष्यवृत्तीसंबंधीच्या तपशिलाची माहिती महिनाभराच्या काळात देण्यात येईल. दरम्यान, दोनापावल येथील मणिपाल इस्पितळ व बिगर सरकारी संघटना यांच्या मदतीने येत्या ५ ऑक्टोबर रोजी पहिले कर्करोग चाचणी शिबिर साखळी येथे, दुसरे शिबिर डिसेंबर महिन्यात पेडणे येथे तर तिसरे मार्च २०१५ ला सांगे येथे होणार आहे. पत्रकार परिषदेला कॅन्सर तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर, गोवा कॅन्सर सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. शेट्ये, कोषाध्यक्ष दामोदर भोसले व सदस्य गंगाराम मोरजकर हे उपस्थित होते.