गोवा काँग्रेसचा निषेध

0
2

सत्ताधाऱ्यांनी मतदारयाद्यांतील घोटाळा थांबवावा, या मागणीसाठी काल राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पणजी शहरातून काढलेला मोर्चा पणजी पोलिसांनी अडवला. या मोर्चात गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकरी पणजीहून आल्तिनो येथील गोवा राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालजवळ मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पणजी शहरात अडवण्यात आले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मतदारयाद्यांतील घोटाळ्याच्या प्रश्नावरून आवाज उठवणाऱ्या व संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा नेणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीतील काही नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस समितीने हा मोर्चा काढला होता, असे पत्रकारांशी बोलताना अमित पाटकर यांनी सांगितले.