गोवा कर्मचारी निवड आयोगाने 8 खात्यांतील जागांच्या भरतीसाठी रविवार 25 फेब्रुवारीला घेतलेल्या सीबीटी परीक्षेचा तात्पुरता निकाल केवळ चोवीस तासात काल जाहीर करण्यात आला. आयोगाने सीबीटी परीक्षेचा निकाल वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.
आयोगाने कर्मचारी निवड प्रक्रिया जलद गतीने करण्यावर भर दिला आहे. कर्मचारी निवड आयोगाने 29 डिसेंबर 2023 रोजी संवर्धन साहाय्यक- 1 जागा, साहाय्यक उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर)- 1 जागा, लाइट हाउस कीपर-1 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 1 जागा, तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स- भौतिकशास्त्र)- 3 जागा, चित्रकला शिक्षक माध्यमिक शाळा- 7 जागा, ग्रंथपाल ग्रेड1- 8 जागा, ग्रंथपाल ग्रेड2- 8 जागा या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते.
सरकारच्या विविध खात्यातील मोजक्याच पदांसाठी शेकडो जणांनी अर्ज सादर केले आहेत. आठ खात्यातील पदांच्या निवडीसाठी रविवारी सीबीटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शेकडो विद्यार्थी बसले होते. त्या परीक्षेचा तात्पुरता निकाल काल वेबसाइटवर जाहीर केला आहे. या पदासाठी अर्ज केलेले काही जण परीक्षेला बसलेले नाहीत.