गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली मोप विरोधात आक्रमक

0
92

मोपा विमानतळ विरोधात दक्षिण गोव्यात गोवन्स फॉर दाबोळी ओन्लीतर्फे आक्रमक पवित्रा घेतला असून गावोगावी जागृती मोहीम हाती घेतली आहे. रविवार दि. ३१ जानेवारी रोजी लोहिया मैदानावर जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सभेत दि. १ फेब्रु. रोजी मोपा विमानतळा संबंधात होणार असलेल्या जाहीर सुनावणीच्यावेळी आपला पवित्रा जाहीर करतील.या संघटनेचे निमंत्रक फा. एरमिता रिबेला यांनी सांगितले की सरकारने विमानतळांसंबंधात पर्यावरण विषयक अहवाल ठेवला आहे तो फार्स आहे. त्याचा तपशील ते लोकांसमारे ठेवतील. हा अहवाल संघटनेला मान्य नसून कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा र्‍हास होऊ देणार नाही. गरज पडल्यास सरकारला त्याची जागा दाखवून दिली जाईल. राज्यांतील विचारवंत व अभ्यासक गप्प असल्याबद्दल त्यानी आश्‍चर्य व्यक्त केले. सरकारने पर्यावरण विषयक संवेदनशील ८४ लाख चौ. मीटर जमीन संपादन केली आहे. त्यावर सुनावणी घेताना गांभीर्य लक्षात घेतले नाही.
दक्षिणेतील आमदारांचा पाठिंबा
मोपा विरोधात दक्षिणेतील काही आमदारांनीही या संघटनेला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. संघटनेने सर्व बाधक बाबी सविस्तर त्यांच्यापुढे ठेवल्या. लवकरच जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार असून सासष्टी तालुक्यात मोपा विरोधाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गोवा सरकारने दाबोळी विमानतळ विस्तारासाठी प्रयत्न चालविले आहेत. मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यानी काल मडगावात प्रजासत्ताक दिन सभारंभावेळी केलेल्या भाषणात दाबोळीचा विस्तार व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न चालविल्याचे सांगितले.