>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गाळे वाटप पत्र प्रदान
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळा (गोमेकॉ) समोरील ज्या गाडेधारकांना त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या कारणाखाली हटवण्यात आले होते, त्यापैकी ३२ गाडेधारकांचे काल पुनर्वसन करण्यात आले. गोमेकॉसमोर नव्याने उभारण्यात आलेले गाडे त्यांना बहाल केल्याची पत्रे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सोडतीद्वारे पहिल्या टप्प्यात ३२ जणांना हे गाडे देण्यात आले. उर्वरित गाडेधारकांना येत्या १५ ते २० दिवसांत गाडे देऊन त्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ज्या ३२ जणांना गाडे वाटप करण्यात आले आहे, त्यांनी ते सध्या ज्या मोकळ्या जागांवर व्यवसाय करत आहे, त्या जागा चार दिवसांत खाली कराव्यात, अशी सूचना सदर गाडेधारकांना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासमोर ३ कोटी रुपये खर्चून ६० गाडे उभारले असून, ज्या ज्या गाडेधारकांना तेथून हटवण्यात आले होते, त्या सर्वांना आता हे गाडे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोमेकॉसमोर गेल्या सुमारे २५ वर्षांपासून तेथे भाजी, फळे, खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंची विक्री करणार्या लोकांचे पुनर्वसन करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हे पुनर्वसन पारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे. सदर गाडेधारकांना १ हजार रुपये एवढे मासिक भाडे भरावे लागणार असून, विजेचा व अन्य खर्चही त्यांना उचलावा लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.