गोमेकॉत अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवणार

0
17

>> आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे; इस्पितळाच्या विभाग प्रमुखांसोबत बैठक

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळा (गोमेकॉ) मध्ये अद्ययावत आरोग्य साधनसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.
इस्पितळातील सर्व विभागातील साधनसुविधांचा आढावा घेतला जाणार असून, विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ सल्लागारांनी भेडसावणार्‍या समस्या मांडाव्यात, तसेच आवश्यक साधनसुविधांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल केले. इस्पितळाच्या विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ सल्लागारांच्या बैठकीत ते बोलत होते. विभाग प्रमुखांकडून सादर करण्यात येणार्‍या प्रस्तावांवर मुख्य सचिव व आरोग्य सचिवांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे आपले उद्दिष्ट असून, नीती आयोगाकडे निधीसाठी संपर्क साधला जाणार आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्य क्षेत्रात मोठा बदल करण्याची गरज आहे. राज्यातील खासगी क्षेत्रापेक्षा गोमेकॉ अग्रेसर इस्पितळ बनविण्याचा आपला मानस आहे. ई-कार्ड आणि इस्पितळ व्यवस्थापन सेवा सुरू केली जाणार आहे. दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात कार्डियाक युनिट सुरू केले जाणार आहे. रुग्णांना सुरळीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर जास्त डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील काही भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोव्यात जूनच्या दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना राणे म्हणाले की, देशाच्या इतर भागातील कोरोना स्थिती आणि गोव्यातील परिस्थिती वेगळी आहे. आत्ताच पुन्हा निर्बंध लागू करणे योग्य होणार नाही. राज्य सरकारकडून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

तूर्त कोरोना निर्बंधांची गरज नाही
राज्यात कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तूर्त निर्बंध लादण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. गरज भासल्यास निर्बंध लादण्यात येतील, असे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.