>> कारस्थानात नातेवाइकांचाही सहभाग
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून शक्रवारी करण्यात आलेले बालकाचे अपहरण हे पूर्वनियोजित कारस्थान असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या कारस्थानात नातेवाईकही सहभागी असल्याचे दिसून आले. विश्रांती गावस ही गरोदर असल्याचा कोणतीही पुरवा नसून गोमेकॉमध्ये बाळंतपण झाल्याची कोणतीही नोंद नाही. त्यावरून विश्रांती हिने पूर्वनियोजित कारस्थान करून त्या बाळाचे अपहरण केल्याचे उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारस्थानात विश्रांतीचा नवरा, मुले तसेच भाऊ व भावजय सामिल असल्याचे दिसून येते. विश्रांती हिने आपल्या मुलांना कोणीही चौकशी करायला आल्यास कसे बोलावे हेही पढवून ठेवले असल्याचे दिसून येते. तसेच विश्रांतीचा भाऊ आणि भावजय यांनीही, आपण गेला एक महिना इथे येतो त्या मुलाला खेळवतो असे सांगितले. मात्र तो मुलगा कुठे आहे याची माहिती कोणीच देत नाहीत. त्यामुळे गोमेकॉतून बालकाचे अपहरण करण्यात ह्या लोकांचा सहभाग होता हे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावाच्या घरी बारसा
शुक्रवारी मुलाचे अपहरण केल्यानंतर त्या मुलाचा बारसा विश्रांतीने आपल्या माहेरी म्हणजे हरवळे येथे भावाच्या घरी केला असे समजते. त्यावरून अपहरण कटात सर्व सामिल असल्याचे सिद्ध होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महिलेस पोलीस कोठडी
बालकाचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या सालेली-सत्तरी येथील विश्रांती गांवस हिला काल प्रथम वर्ग न्यायदंडधिकार्यांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला. त्यानंतर तिची आगशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांनी अपहरणकर्त्या महिलेच्या टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारावर या महिलेचा शोध घेतला.
असे झाले अपहरण
विश्रांती शुक्रवारी सकाळी चांगला पोशाख़ करून बांबोळी येथे वॉर्ड चौदामध्ये गेली, जिथे पोलिओचा डोस दिला जातो. त्याच ठिकाणी मुलाची आई पोलिओचा डोस देण्यासाठी मुलाला घेऊन आली. त्या मुलाच्या आईबरोबर तिचा नवरा व एक मुलगी होती. विश्रांतीने त्यांना बाहेर कुणाचे पैसे पडले आहेत ते पाहून या असे सांगितले. त्या नंतर ती मुलगी व मुलाच्या आईचा नवरा ते पैसे पाहण्यासाठी बाहेर गेले. तोपर्यंत विश्रांती त्या मुलाला खेळवित होती. नंतर विश्रांतीने मुलाच्या आईकडे शंभर रुपये देऊन दोन सामोसा घेऊन ये म्हणून सांगितले आपण मुलाला पाहते असे सांगितले. मुलाच्या आईने यावेळी विश्रांतीवर विश्वास ठेवला व ती सामोसे आणण्यासाठी बाहेर गेली. हीच संधी साधून त्या मुलाला घेऊन विश्रांतीने पळ काढला.